KL Rahul Has Chance To Break Record Of Virat Kohli: आयपीएल २०२५ स्पर्धेत आज डबल हेडर सामन्यांचा थरार रंगणार आहे. दोन्ही सामने प्लेऑफच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे असणार आहेत. पहिला सामना राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. हा सामना जयपूरच्या मैदानावर खेळवला जाईल. तर दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स हे दोन्ही संघ भिडणार आहेत. हा सामना दिल्लीत रंगणार आहे. या सामन्यात दिल्लीचा स्टार फलंदाज केएल राहुलकडे इतिहास रचण्याची संधी असणार आहे.

केएल राहुलकडे इतिहास रचण्याची संधी

केएल राहुलकडे टी –२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद ८ हजार धावा पूर्ण करण्याची संधी असणार आहे. हा कारनामा करण्यासाठी त्याला अवघ्या ३३ धावांची गरज आहे. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर फलंदाजीला आल्यानंतर त्याला अवघ्या ३३ धावा करायच्या आहेत. असं झाल्यास तो टी –२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद ८ हजार धावांचा पल्ला गाठणारा भारतीय फलंदाज ठरेल.

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने हा कारनामा २४३ व्या डावात करून दाखवला होता. यासह तो असा कारनामा करणारा जगातील दुसराच फलंदाज ठरेल. पाकिस्तानचा फलंदाज बाबर आझम या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. बाबर आझमने हा कारनामा २१८ व्या डावात करून दाखवला होता.

अव्वल स्थानी कोण?

वेस्टइंडिजचा दिग्गज फलंदाज ख्रिस गेल या यादीत अव्वल स्थानी आहे. ख्रिस गेलने टी –२० क्रिकेटमध्ये फलंदाजी करताना अवघ्या २१३ व्या डावात ८ हजार धावांचा पल्ला गाठला होता. हा विक्रम अजूनपर्यंत कोणीही मोडू शकलेलं नाही. आज होणाऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सकडून केएल राहुलला डावाची सुरूवात करण्याची संधी मिळू शकते. त्यामुळे तो फलंदाजीत किती धावा कुटणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या हंगामात लखनऊ सुपर जायंट्स संघाचं नेतृत्व करणारा केएल राहुल या हंगामात दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळत आहे. या हंगामात त्याने फलंदाजीत दमदार कामगिरी करून दाखवली आहे. त्याच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने १० सामन्यांमध्ये ४७.६३ च्या सरासरीने ३८१ धावा केल्या आहेत. तसेच त्याच्या आयपीएल कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने आतापर्यंत १४३ सामन्यांमध्ये ५०६४ धावा केल्या आहेत.