Royal Challengers Bangalore vs Kolkata Knight Riders IPL Match Updates : आयपीएल २०२३ चा ३६ वा सामना बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होत आहे. आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या कोलकाताचे सलामीवीर फलंदाज जेसन रॉय आणि एन जगदिशनने पॉवर प्ले मध्ये धडाकेबाज फलंदाजी केली. पण त्यानंतर आरसीबीचा वेगवान गोलंदाज विजयकुमारने रॉयचा ५६ धावांवर असताना त्रिफळा उडवला. तसंच जगदिशनलाही विजयकुमारने २७ धावांवर असताना झेलबाद केलं. त्यामुळे आरसीबीच्या धावसंख्येचा वेग मंदावला होता. मात्र, कर्णधार नितीश राणा आणि व्येंकटेश अय्यरने जोरदार फटकेबाजी केल्यामुळं कोलकाताने २० षटकांत ५ विकेट्स गमावत २०० धावांपर्यंत मजल मारली. त्यामुळे आरसीबीला विजयासाठी २०१ धावांचं लक्ष्य गाठावं लागणार आहे.

कोलकाता नाईट रायडर्सचे सलामीवीर फलंदाज बाद झाल्यानंतर कर्णधार नितीश राणा आणि व्येंकटेश अय्यरने केकेआरची कमान सांभाळली. केकेआरसाठी जेसन रॉयने पाच षटकार चार चौकारांच्या मदतीने २९ चेंडूत ५६ धावांची अप्रतिम अर्धशतकी खेळी केली. तर जगदिशनने २९ चेंडूत २७ धावांची खेळी केली. नितीश राणाने चौफेर फटकेबाजी करत चार षटकार आणि तीन चौकारांच्या मदतीनं २१ चेंडूत ४८ धावांची खेळी साकारली. हसरंगाच्या गोलंदाजीवर नितीश राणा ४८ धावांवर झेलबाद झाला.

याच षटकात हसरंगाने व्येंकटेश अय्यरला ३१ धावांवर बाद करत कोलकाताला मोठा धक्का दिला. आरसीबीसाठी वानिंदू हसरंगाने आणि विजयकुमारने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. कोलकाताने पॉवर प्ले मध्ये आक्रमक सुरुवात केली होती. मात्र दोन फलंदाज बाद झाल्यानंतर कोलकाताची धावसंख्या मंदावली होती. परंतु, १५ षटकानंतर राणा आणि अय्यरने आरसीबीच्या गोलंदाजांचा समाचार घेतला आणि धावसंख्येचा आलेख चढता ठेवला. त्यानंतर मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर आंद्रे रसल एक धाव करून क्लीन बोल्ड झाला. तर रिंकू सिंगने अप्रतिम फलंदाजी करून १० चेंडूत १८ धावांची नाबाद खेळी केली. तर डेविड विजाने ३ चेंडूत १२ धावा कुटल्या.