Hardik Pandya Reacts To Defeat : आयपीएल २०२४ मधील आठवा सामना राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम हैदराबाद येथे पार पडला. या सामन्यात हैदराबादने विक्रमी धावसंख्या उभारत मुंबईचा ३१ धावांनी धुव्वा उडवला. मुंबईचा हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील सलग दुसरा पराभव ठरला. सनरायझर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना ३ गड्यांच्या मोबदल्यात २७७ धावा केल्या होत्या. मात्र प्रत्युत्तरात मुंबईला २४६ धावाच करता आल्या. या पराभवानंतर कर्णधार हार्दिक पंड्याने पराभवाचे कारण सांगितले.

या सामन्यात एकूण ५२३ धावा झाल्या, हा आयपीएलचा विक्रम आहे. एवढेच नाही तर या सामन्यात ३८ षटकार मारले गेले, जो टी-२० क्रिकेटमधील एक नवा विक्रम आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्धचा सामना गमावल्यानंतर मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार हार्दिक पंड्याने मोठे वक्तव्य केले आहे. मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२४ मध्ये हार्दिक पंड्याला आपला कर्णधार बनवले आणि आतापर्यंत त्याच्या नेतृत्वाखाली संघाची कामगिरी खूपच खराब झाली आहे.

कर्णधार हार्दिक पंड्याची पराभवावर प्रतिक्रिया –

पहिल्या सामन्यात मुंबईला गुजरात टायटन्सकडून पराभव पत्करावा लागला होता. आता दुसऱ्या सामन्यात मुंबईचा हैदराबादविरुद्धही पराभव झाला. ज्यामुळे मुंबई इंडियन्स संघ गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे. या पराभवावर बोलताना हार्दिक पंड्या म्हणाला, “वास्तविक सनरायझर्स हैदराबाद संघ २७७ धावा करेल, असे आम्हाला वाटले नव्हते. खेळपट्टी चांगली होती. तुम्ही कितीही वाईट किंवा चांगली गोलंदाजी केली तरीही विरोधी संघाने एवढी मोठी धावसंख्या उभारली म्हणजे त्यांनी चांगली फलंदाजी केली. गोलंदाजांसाठी ही खेळपट्टी चांगली नव्हती. खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल होती, ज्यामुळे जवळपास ५०० धावांचा पाऊस पडला.”

हेही वाचा – IPL 2024 : हैदराबादविरुद्धच्या सामन्यात वर्ल्डकप गाजवणाऱ्या मुंबईच्या गोलंदाजाची धुलाई; नावावर नोंदला गेला नकोसा विक्रम

आपल्या संघाचा बचाव करताना हार्दिक पंड्या म्हणाला, “आमच्याकडे तरुण गोलंदाजी आक्रमण आहे आणि आम्ही शिकू. चेंडू वारंवार प्रेक्षकांमध्ये जात असल्याने षटक पूर्ण करण्यासाठी वेळ लागतो. सर्व फलंदाजांना चांगली कामगिरी केली.” मुंबईने या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा १७ वर्षीय युवा वेगवान गोलंदाज क्वेना मफाकाला पदार्पण करण्याची संधी दिली. या सामन्यात क्वेना मफाकाने ४ षटकात ६६ धावा दिल्या. यावरही हार्दिक पंड्याने प्रतिक्रिया दिली.

क्वेना मफाकाबद्दल हार्दिक पंड्या काय म्हणाला?

हार्दिक पंड्या म्हणाला, “युवा क्वेना मफाका चांगला वेगवान गोलंदाज आहे. पण त्याला अजून काही सामने खेळण्याची गरज आहे.” या सामन्यात क्वेना मफाकाला एकही विकेट मिळाली नाही. या दरम्यान त्याचा इकॉनॉमी रेटही १६.५० होता. आयपीएल पदार्पणातील कोणत्याही गोलंदाजाची ही सर्वात खराब गोलंदाजी आहे. दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाज क्वेना मफाकाने अद्याप कोणताही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही, परंतु या १७ वर्षीय वेगवान गोलंदाजाने २०२४ अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेत ९.७१ च्या सरासरीने २१ विकेट्स घेतल्या होत्या आणि त्याला स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले होते.