Sunrisers Hyderabad vs Mumbai Indians Match Updates : आयपीएल २०२४ मधील आठवा सामना हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स आमनेसामने आले होते. ज्यामध्ये हैदराबादने मुंबईचा धुरळा उडवत ३१ धावांनी विजय मिळवला. या विजयासह हैदराबादने गुणतालिकेत खातं उघडलं आहे. तर मुंबईला सलग दुसऱ्या सामन्यात पराभव पत्करावा लागला असून मुंबईची पाटी कोरीच आहे. या सामन्यात हैदराबदने प्रथम फलंदाजी करताना मुंबईसमोर तब्बल २७८ धावांचा पर्वत उभा केला होता. त्याच्या प्रत्युत्तरात मुंबईच्या संघाला निर्धारित २० षटकांत ५ बाद २४६ धावांपर्यंत मजल मारता आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या सामन्यात मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याचं सुमार दर्जाचं नेतृत्व पाहायला मिळालं. नाणेफेक जिंकून हार्दिकने हैदराबादच्या संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. या निर्णयावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच संघातला महत्त्वाचा गोलंदाज असलेल्या जसप्रीत बुमराहला पॉवर प्लेमध्ये केवळ एकच षटक (चौथं) दिलं. त्यानंतर बुमराहला थेट १२ व्या षटकात गोलंदाजीसाठी पाचारण करण्यात आलं. तोवर ११ षटकात हैदराबादच्या फलंदाजांनी १६० हून अधिक धावा फटकावल्या होत्या. या काळात बुमराहने केवळ एकच षटक टाकलं होतं आणि त्या षटकात त्याने केवळ ५ धावा दिल्या होत्या. हार्दिकने योग्य क्रमाने गोलंदाजांचा वापर केला नाही. नवख्या गोलंदाजाकरवी सामन्याची सुरुवात केली, हार्दिककडून अशा अनेक चुका झाल्या. ज्याचा हैदराबादच्या फलंदाजांनी पुरेपूर फायदा उचलला, तसेच मुंबईच्या गोलंदाजांची धुलाई करत विक्रमी २७८ धावांचा पर्वत उभा केला.

दरम्यान, हार्दिकचं सुमार दर्जाचं नेतृत्व पाहून त्याच्यावर सध्या टीकेचा भडीमार होत आहे. या सामन्यावेळी समालोचन करणाऱ्या माजी क्रिकेटपटूंनी, क्रिकेट समीक्षकांनी आणि क्रीडारसिकांनी हार्दिकवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. समाजमाध्यमांवर ही टीका पाहायला मिळत आहे. मुंबईच्या पहिल्या सामन्यातील पराभवानंतर समाजमाध्यमांवर हार्दिक मोठ्या प्रमाणात ट्रोल झाला होता. आता पुन्हा एकदा तीच परिस्थिती उद्भवली आहे.

भारताचे दोन माजी दिग्गज अष्टपैलू खेळाडू युसूफ पठाण आणि इरफान पठाणने हार्दिकवर टीका केली आहे. पठाण बंधूंनी हार्दिकच्या नेतृत्वगुणांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. दोघांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मद्वारे त्यांची नाराजी व्यक्त केली आहे. इरफान पठाणने एक्सवर लिहिलं आहे की, “हार्दिक पांड्याचं नेतृत्व हे अगदीच साधारण आहे. इतर गोलंदाजांची धुलाई होत असताना बुमराहसारख्या तगड्या गोलंदाजाला गोलंदाजी न देणं हा निर्णय माझ्या समजण्यापलकडचा आहे.”

युसूफ पठाणने म्हटलं आहे की, सनरायझर्स हैदराबादने अवघ्या ११ षटकांमध्ये १६० हून अधिक धावा चोपल्या आहेत आणि अशा परिस्थितीत जसप्रीत बुमराहला गोलंदाजीसाठी केवळ एक षटक दिलंय. माझ्या मते कर्णधार म्हणून घेतलेला हा वाईट निर्णय आहे.

हे ही वाचा >> IPL 2024 : ‘रन’ धुमाळीत हैदराबादची सरशी, मुंबई इंडियन्सवर ३१ धावांनी विजय

फलंदाज म्हणूनही अपयशी

हार्दिक पांड्या या सामन्यात फलंदाज म्हणूनही अपयशी ठरला. संघाला २० षटकांत २७९ धावांची आवश्यकता असताना प्रत्येक फलंदाजाने २०० ते २२५ च्या स्ट्राईक रेटने धावा जमवणं आवश्यक होतं. मुंबईच्या सर्व फलदाजांनी १९० पेक्षा अधिकच्या स्ट्राईक रेटने धावा फटकावल्या. मात्र हार्दिक पांड्या मात्र अवघ्या १२० च्या स्ट्राईक रेटने २० चेंडूत २४ धावा जमवून माघारी परतला. यावरूनही इरफान पठाणने हार्दिकला टोला लगावला आहे.

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mi vs srh hardik pandya ordinary captaincy irfan and yusuf pathan criticize after mumbai indians defeat asc
First published on: 27-03-2024 at 23:51 IST