MS Dhoni Is Playing Last IPL Game?: चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळल्या जाणाऱ्या सामन्यात, नाणेफेकीदरम्यान एमएस धोनीने असं काही वक्तव्य केलं की धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांनी जोर धरला आहे. जेव्हा समालोचक डॅनी मॉरिसन यांनी नाणेफेकीदरम्यान धोनीला २०२६ मध्ये खेळण्याविषयी प्रश्न विचारला. यावर धोनीने एक विधान केले ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला.

चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामन्यापूर्वी नाणेफेकीदरम्यान, जेव्हा धोनीला त्याच्या भविष्याबद्दल आणि विशेषतः पुढील आयपीएल हंगामाबद्दल विचारण्यात आले तेव्हा ‘कॅप्टन कूल’ने लगेच सांगितले की सध्या त्याला हेही माहित नाही की तो पुढचा सामना खेळेल की नाही.

चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर, जेव्हा एमएस धोनी बोलण्यासाठी आला तेव्हा समालोचक डॅनी मॉरिसनने त्याला त्याच्या आयपीएल भविष्याबद्दल विचारले. धोनी बोलण्यासाठी येताच चेपॉकवर एकच जल्लोष पाहायला मिळाला. तेव्हा हा आवाज ऐकताच मॉरिसन यांनी विचारलं, “हा आवाज ऐकता तू पुढच्या वर्षीही पुन्हा खेळण्यासाठी येणारेस तर?”

यावर धोनी म्हणाला, “मला नाही माहित, मला हेही माहित नाही की पुढचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे की नाही माहित नाही.” हे बोलल्यानंतर धोनी हसायला लागला आणि मॉरिसनलाही त्याचे हसू आवरता आलं नाही.

धोनीने विनोद करत हे म्हटलं असलं तरी प्रत्येक वेळेस, त्याच्या विधानाने चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. आता चाहत्यांच्या मनात नेहमीच ही भीती असेल की धोनी अचानक आयपीएलमधून निवृत्ती घेणार का? असंही या हंगामात चेन्नईची परिस्थिती पाहता धोनी संपूर्ण हंगाम खेळेल. कारण आणि कर्णधार ऋतुराज गायकवाड आधीच दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे. गायकवाड स्पर्धेबाहेर झाल्यानंतर, जवळजवळ २ वर्षांनी धोनीने पुन्हा संघाची सूत्रे हाती घेतली.

आयपीएल२०२५ च्या हंगामात धोनीच्या निवृत्तीच्या बातम्यांनी याआधीही जोर धरला होता. धोनीने संघाची सूत्रे हाती घेण्यापूर्वी, दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान त्याच्या निवृत्तीची चर्चा जोरदार सुरू होती. याचं कारण म्हणजे धोनीचे आई-बाबा पहिल्यांदाच त्याला मैदानात खेळताना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचले होते. धोनीच्या संपूर्ण कारकिर्दीत पहिल्यांदाच त्याचे आई-बाबा सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचले. यामुळे अफवा पसरल्या की हा धोनीचा शेवटचा आयपीएल सामना असेल, परंतु तसं झालं नाही.