MI vs SRH IPL 2025: मुंबई इंडियन्सने घरच्या मैदानावर झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा शानदार पराभव करत यंदाच्या मोसमातील सलग दुसरा विजय नोंदवला आहे. तिलक वर्माचा चौकारासह मुंबईने हैदराबादचा ४ विकेट्सने पराभव केला आहे. मुंबई इंडियन्सला सनरायझर्स हैदराबादने विजयासाठी १६३ धावांचे आव्हान दिले होते. मुंबई इंडियन्सने हे आव्हान १८.१ षटकांत १६६ धावा केल्या. या विजयानंतरही मुंबईचा संघ सातव्या स्थानीच असणार आहे. तर हैदराबादचा संघ ९व्या स्थानी आहे.

१८व्या षटकात मोठा ड्रामा पाहायला मिळाला. मुंबईला विजयासाठी २ धावांची गरज असताना तिलकने एक धाव घेत हार्दिकला स्ट्राईक दिली. हार्दिक पुढच्या चेंडूवर झेलबाद झाला. तर नमन धीर दोन चेंडूवर एकही धाव काढू शकला नाही. तर पाचव्या चेंडूवर नमन धीर पायचीत झाला. तर अखेरच्या चेंडूवर सँटनर एक धाव घेण्यात अपयशी ठरला. अखेरीस तिलक वर्माने १९व्या षटकात झीशान अन्सारीच्या पहिल्या चेंडूवर चौकार लगावत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.

हैदराबादने दिलेल्या १६३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईने झटपट सुरूवात केली. विशेषतः रोहित शर्माने वानखेडेवर ३ षटकार लगावत उपस्थित असलेल्या चाहत्यांची मनं जिंकली. पण पुन्हा एकदा, रोहित (२६) त्याच्या डावाचे मोठ्या धावसंख्येत रूपांतर करण्यात अपयशी ठरला. रायन रिकेल्टन (३१) ने काही मोठे फटके मारले आणि त्यानंतर सूर्यकुमार यादवने २ चौकार २ षटकार लगावत २६ धावांची खेळी केली.

दरम्यान, विल जॅक्सनेही संघाच्या धावसंख्येत मोठी भर घातली. विल जॅक्स २६ चेंडूत २ षटकार आणि ३ चौकारांसह ३६ धावा करत बाद झाला. सूर्या आणि विलने २९ चेंडूत ५२ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. तर पॅट कमिन्सने (३/२६) दोन्ही विकेट घेऊन पुनरागमनाच्या आशा निर्माण केल्या असल्या तरी, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. हार्दिक पंड्या (२१) आणि तिलक वर्मा (१७) यांनी संघाला विजय मिळवून दिला.

वादळी फलंदाजी करणाऱ्या सनरायझर्स हैदराबाद संघाला मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजीसमोर मोठी धावसंख्या उभारता आली नाही. अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड या स्फोटक सलामी जोडीला चौकार आणि षटकार मारण्यासाठी संघर्ष करावा लागला. अभिषेकने तरीही काही छान फटके मारून ४० धावांची खेळी करत संघाला जलद सुरुवात देण्याचा प्रयत्न केला, पण हेड त्याच्या संपूर्ण डावात संघर्ष करत राहिला आणि २८ धावा करत माघारी परतला. परिणामी १० षटकांत फक्त ७५ धावा काढता आल्या आणि १५ षटकांत फक्त १०५ धावा करण्यात हैदराबादचा संघ यशस्वी झाला.

हेनरिक क्लासेन (३७) ने वेग थोडा वाढवला आणि १८ व्या षटकात २१ धावा फटकावल्या. त्यानंतर २० व्या षटकात, हैदराबादने हार्दिक पंड्याच्या ३ षटकारांसह २२ धावा काढत १६२ धावांचा टप्पा गाठला. मुंबई इंडियन्सकडून वि जॅक्सने सर्वाधिक २ विकेट्स घेतले. विल जॅक्सला त्याच्या या सामन्यातील अष्टपैलू कामगिरीसाठी सामनावीराचा पुरस्कार मिळाला.