मुंबई इंडियन्सचा विस्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव लवकरच संघात परतणार आहे. एमआयने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून हे संकेत दिले आहेत. मुंबई इंडियन्सचा पुढील सामना रविवारी दिल्ली कॅपिटल्सविरूद्ध होणार आहे. या सामन्यात सूर्यकुमार यादव खेळताना दिसण्याची शक्यता आहे. सूर्या दुखापतीमुळे या हंगामातील सुरूवातीचे काही सामने खेळू शकलेला नाही. त्याचसोबत संघाची कामगिरीही निराशाजनक राहिली आहे. एमआयला आतापर्यंत खेळलेल्या ३ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.

मुंबई इंडियन्सने त्यांच्या सोशल मिडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एमआयच्या खेळाडूंना विचारलं जातंय की कोण येत आहे, त्यावर ते एकेक जण उत्तर दिसताना आहे. दादा, सुपला शॉट, मिस्टर ३६०, अक्षय कुमार यादव अशी एकेकाने उत्तर दिल्यानंतर सूर्याचे काही फोटो दाखवण्यात आले. ही सगळी विशेषणे सूर्या आणि त्याच्या फटकेबाजीसाठी वापरली जातात. आता या व्हीडिओनंतर मात्र सूर्या लवकरच संघात दाखल होणार आहे, यावर शिक्कामोर्तब झाला आहे.

सूर्यकुमार यादव डिसेंबर २०२३ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. याआधी त्याच्या घोट्याच्या दुखापतीवर उपचार सुरू होते. त्यानंतर त्याच्यावर स्पोर्ट्स हर्नियाची शस्त्रक्रिया झाली. सुमारे ४ महिन्यांनी सूर्या मैदानावर परतणार आहे. आयपीएल २०२४ सोबतच सूर्याचे पुनरागमनही भारतीय संघासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. आयपीएल २०२४ नंतर टी-२० विश्वचषक खेळवला जाईल, ज्यामध्येही सूर्याची भूमिका महत्त्वाची असणार आहे.

सूर्याच्या पुनरागमनामुळे मुंबई इंडियन्सची फलंदाजी अधिक मजबूत होईल. एमआयची मधली फळी अजूनही अननुभवी आहे. सूर्याच्या एंट्रीमुळे मधल्या फळीला अधिक बळ मिळेल. सूर्यकुमार यादने आतापर्यंत खेळलेल्या १३९ सामन्यांमध्ये ३२.१७ च्या सरासरीने आणि १४३.३२ च्या स्ट्राइक रेटने ३२४९ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने २१ अर्धशतक आणि १ शतक झळकावले आहे. सूर्यकुमार यादवची आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्या नाबाद १०३* धावा आहे. आयपीएल २०२३ मध्ये सूर्याची कामगिरी जबरदस्त होती. गेल्या मोसमात त्याने ४३.२१ च्या सरासरीने आणि १८१.१४ च्या उत्कृष्ट स्ट्राईक रेटने ६०५ धावा केल्या. गेल्या मोसमात सूर्याने ५ अर्धशतके आणि १ शतक झळकावले होते.