आयपीएलच्या सतराव्या हंगामाची सुरुवात चेन्नई-बंगळुरू लढतीने झाली. चेन्नईचा नवीन कर्णधार ऋतुराज गायकवाडने चार विदेशी खेळाडूंबद्दल माहिती दिली. रचीन रवींद्र, डॅरेल मिचेल, मुस्ताफिझूर रहमान हे चेन्नईसाठी पदार्पण करतील असं ऋतुराजने सांगितलं. ऋतुराजच्या या घोषणेसह काही वर्षांपूर्वी महेंद्रसिंह धोनीशी पंगा घेणारा मुस्ताफिझूर त्याच्याच संघातील प्रमुख गोलंदाज ठरल्याचं स्पष्ट झालं. मुस्ताफिझूरने चेन्नई पदार्पणातच दोन षटकात बंगळुरूच्या चार फलंदाजांना माघारी धाडलं आहे.
तो दिवस मुस्ताफिझूर कधीच विसरणार नाही. १८ जून २०१५. याच दिवशी मुस्ताफिझूरला बांगलादेश कॅप देण्यात आली. कोणत्याही खेळाडूसाठी देशासाठी खेळणं अभिमानाचा क्षण असतो.
२५व्या षटकादरम्यान गोलंदाजी रनअपदरम्यान मुस्ताफिझूर महेंद्रसिंह धोनीच्या वाटेत येत असल्याचं दिसलं. धोनी एकेरी धाव घेण्याच्या प्रयत्नात होता. प्रत्युत्तर म्हणून धोनीने वाटेत उभ्या राहिलेल्या मुस्ताफिझूरला कोपराने धक्का दिला. यामुळे मुस्ताफिझूर कळवळला. त्याला उपचारांसाठी मैदान सोडावं लागलं. ३७व्या षटकात तो गोलंदाजीसाठी परतला.
पदार्पणाच्या लढतीत मुस्ताफिझूरने ५० धावात ५ विकेट्स पटकावत सामनावीराचा पुरस्कार पटकावला. त्या लढतीत बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना ३०७ धावांची मजल मारली. तमीम इक्बालने ६० तर सौम्या सरकारने ५४ धावांची खेळी केली. शकीब उल हसनने ५२ धावांची खेळी करत या दोघांना चांगली साथ दिली. भारताकडून रवीचंद्रन अश्विनने ३ तर भुवनेश्वर कुमार आणि उमेश यादव यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
प्रत्युत्तरादाखल खेळताना भारताचा डाव २२८ धावांतच आटोपला. रोहित शर्माने सर्वाधिक ६३ धावांची खेळी केली. मुस्ताफिझूरच्या गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजांनी शरणागती पत्करली.
फसवे स्लोअरवन, कटर आणि बॅक ऑफ द हँड चेंडू टाकण्यासाठी मुस्ताफिझूर प्रसिद्ध आहे. चेन्नईच्या संथ खेळपट्टीवर मुस्ताफिझूर उपयुक्त ठरू शकतो हे हेरुन चेन्नईने लिलावात २ कोटी रुपये खर्चून त्याला ताफ्यात समाविष्ट केलं. सलामीच्या लढतीत त्याला पदार्पणाची संधी देत चेन्नईने त्यांच्या डावपेचांचा भाग असल्याचं सिद्ध केलं.
मुस्ताफिझूरने १५ टेस्ट, १०४ वनडे आणि ९१ ट्वेन्टी२० लढतीत बांगलादेशचं प्रतिनिधित्व केलं आहे. आयपीएल स्पर्धेत तो याआधी दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स, सनरायझर्स हैदराबाद संघासाठी खेळला आहे.