आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील तिसरा सामना चांगलाच रोमांचकारी ठऱला. या तिसऱ्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्ज यांच्यात जोरदार लढत झाली. बंगळुरुने २०६ धावांचे उभे केलेले आव्हान पंजाबने स्वीकारून आजचा सामना खिशात घातला. पहिल्याच सामन्यात पंजाबने पाच गडी राखून दणदणीत विजय मिळवला. पंजाबसमोर २०६ धावांचे तगडे आव्हान उभे करण्यासाठी बंगळुरुचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने मोठी भूमिका बजावली. त्याने ५६ चेंडूंमध्ये ७ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने ८८ धावा केल्या. मात्र शेवटी बंगळुरुला पराभवाचा सामना करावा लागला.

विजयासाठी प्रत्येक फलदांजाचे योगदान

बंगळुरुने दिलेल्या २०६ धावांचे लक्ष्या गाठताना पंजाबच्या राज बाजवा वगळता सर्वच फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. सलामीला आलेला कर्णधार मयंक अग्रवालने सुरुवातीला चांगले फटके मारण्याचा प्रयत्न केला. दोन षटकार आणि दोन चौकार यांच्या मदतीने अग्रवालने २४ चेंडूंमध्ये ३२ धावा केल्या. तर अग्रवालसोबत सलामीला आलेल्या शिखर धवनने तुलनेने चांगला खेळ करत २९ चेंडूंमध्ये पाच षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने संघासाठी ४३ धावा केल्या. हर्षल पटेलने फेकलेल्या चेंडूंवर झेलबाद झाल्यामुळे त्याचे अर्धशतक हुकले. तर अशीच स्थिती भानुका राजपक्षे याची झाली. त्याने २२ चेंडूंमध्ये चार षटकार आणि दोन चौकारांच्या मदतीने ४३ धावा केल्या.

शाहरुख खान आणि ओडेन स्मिथ यांनी संघाला सावरलं

त्यानंतर मात्र लिव्हिंगस्टोन आणि राज बावा यांनी निराशा केली. लिव्हिंगस्टोनने १० चेंडूमध्ये १९ धावा केल्या. तर राज बावा खातंदेखील उघडू शकला नाही. मोहम्मद सिराजने फेकलेल्या चेंडूवर तो पायचित झाला. मात्र त्यानंतर शाहरुख खान आणि ओडेन स्मिथ यांनी अनुक्रमे २४ आणि २५ धावा करत संघाला विजयापर्यंत नेलं. शेवटी दोघेही नाबाद राहिले.

फाफ डू प्लेसिसने मोठी भूमिका बजावली

याआधी पंजाबसमोर २०६ धावांचे तगडे आव्हान उभे करण्यासाठी बंगळुरुचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने मोठी भूमिका बजावली त्याने ५६ चेंडूंमध्ये ७ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने ८८ धावा केल्या. डू प्लेसिससोबत सलामीला आलेला अनुज रावत फार काळ मैदानावर टिकू शकला नाही. त्याने २० चेंडूंमध्ये एक षटकार आणि दोन चौकारांच्या मदतीने २१ धावा केल्या. राहुल चहरच्या चेंडूंवर त्याचा त्रिफळा ऊडाला.

विराट कोहलीनेही केल्या ४१ धावा

त्यानंतर मैदानात बंगळुरुचा माजी कर्णधार विराट कोहली फलंदाजीसाठी आला. त्याने डू प्लेसिसला चांगलीच साथ दिला. कोहलीने २९ चेंडूंमध्ये दोन षटकार आणि एक चौकाराच्या मदतीने ४१ धावा केल्या. तर दुसरीकडे अर्धशतक झाल्यानंतर फाफ डू प्लेसिसने कशाचेही बंधन न पाळता जोरदार खेळ केला. अर्षदीपसिंगने फेकलेल्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करताना तो झेलबाद झाला. शाहरुख खानने डू प्लेसिसचा झेल झेलला.

डू प्लेसिस बाद झाल्यानंतर दिनेश कार्तिक फलदांजीसाठी मैदानात उतरला. नंतर कोहली आणि कार्तिक यांनी चांगला खेळ करत संघाला २०५ धावांपर्यंत नेऊन पोहोचवले. कार्तिकने १४ चेंडूंमध्ये तीन षटकार आणि तीन चौकार यांच्या मदतीने ३२ धावा केल्या. तर दुसरीकडे पंजाबच्या एकाही गोलंदाजांने चांगली कामगिरी केली नाही. ओडेन स्मिथने चार षटके टाकली. यामध्ये त्याला एकही बळी मिळाला नाही. मात्र त्याने चार षटकांत सर्वात जास्त म्हणजेच ५२ धावा दिल्या. तर राहुल चहर आणि अर्षदीप सिंग यांनी बंगळुरुच्या प्रत्येकी एका गड्याला बाद केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.