Phil Salt RCB Opener Returned In India: आयपीएल २०२५ चा अंतिम सामना सुरू होण्यास आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. अशात चौथ्यांदा आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूसाठी दिलासादायक बातमी आली आहे. विराट कोहलीचा सलामी जोडीदार फिल सॉल्ट आज पहाटे ३ वाजता अहमदाबादला पोहचला असून, तो आजच्या अंतिम सामन्यात खेळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मुलाच्या जन्मासाठी क्लॉलिफायरचा सामना खेळल्यानंतर फिल सॉल्ट इंग्लंडला गेला होता. त्यामुळे तो अंतिम सामन्यात खेळणार की नाही याबाबत खूप चर्चा सुरू होती. पण, आज पहाटे तो भारतात परतल्यामुळे आज बंगळुरूसाठी विराट कोहलीबरोबर सॉल्टच फलंदाजीला उतरणार हे निश्चित आहे.

यंदाच्या हंगामात बंगळुरूसाठी सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंमध्ये फिल सॉल्टचाही समावेश आहे. फिल सॉल्टने क्वॉलिफायर १ सामन्यात पंजाबविरुद्ध अर्धशतक झळकावत संघाला विजय मिळवून दिला होता.

हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, फिल सॉल्ट मंगळवारी पहाटे अहमदाबादला परतला आहे. तो अंतिम सामन्यापूर्वी संघात सहभागी झाला असून, अंतिम सामना खेळण्यासाठी सज्ज आहे.

आयपीएल २०२५ च्या हंगामात फिल सॉल्ट हा आरसीबीसाठी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहे. त्याने १२ सामन्यांमध्ये, ३५.१८ च्या सरासरीने आणि १७५.९० च्या स्ट्राईक रेटने ३८७ धावा केल्या आहेत. सॉल्टने पंजाब किंग्जविरुद्ध क्वालिफायर १ मध्ये दमदार कामगिरी करत २७ चेंडूत ६ चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद ५६ धावा केल्या होत्या. सॉल्टच्या या खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आठ विकेट्स आणि १० षटके शिल्लक राखून विजय मिळवला होता.

टिम डेव्हिडला संधी मिळण्याची शक्यता कमी

दरम्यान, पंजाबविरुद्धच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज टिम डेव्हिडला बंगळुरू संघातून खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. कारण डेव्हिड लखनौच्या एकाना स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या लीग स्टेज सामन्यादरम्यान झालेल्या हॅमस्ट्रिंग दुखापतीतून अद्याप सावरलेला नाही.

लियाम लिव्हिंगस्टोन की टिम सेफर्ट?

दुसरीकडे या हंगामात निराशाजनक कामगिरी करणाऱ्या लियाम लिव्हिंगस्टोनला बंगळुरू संघात कायम ठेवणार की, संघ व्यवस्थापन अंतिम सामन्यात त्याच्या जागी न्यूझीलंडच्या टिम सेफर्टला मधल्या फळीत आजमावण्याचा निर्णय घेणार हे पाहावे लागेल.

Live Updates