Ahmedabad Weather Forecast IPL 2025 Final : रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि पंजाब किंग्ज हे दोन्ही संघ यंदाच्या आयपीएल फायनलसाठी सज्ज झाले आहेत. हे दोन्ही संघ गेल्या १७ वर्षांपासून आयपीएल जेतेपदाच्या प्रतीक्षेत आहेत. यंदा दोनपैकी एक संघ त्यांचा जेतेपदाचा दुष्काळ संपवणार आहे. यंदाच्या आपीएल स्पर्धेत हे दोन्ही संघ सुरुवातीपासून गुणतालिकेत सर्वात वर होते. साखळी फेरीअखेर दोन्ही संघ पहिल्या व दुसऱ्या स्थानावर होते. बँगलोर व पंजाबने संपूर्ण स्पर्धेत सर्वच संघांवर वर्चस्व राखलं. त्यामुळेच आज दोन्ही संघ स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल झाले आहेत.
दरम्यान, आजच्या अंतिम सामन्यात पंजाबविरोधात बँगलोरचं पारडं जड आहे. कारण यंदाच्या मोसमात दोन्ही संघ तीन वेळा भिडले आहेत. त्यापैकी दोन सामन्यांमध्ये बँगलोरने विजय मिळवला आहे. तर, एका सामन्यात पंजाबच्या संघाची सरशी झाली होती. विशेष म्हणजे गेल्या आठवड्यात उभय संघात पहिला क्वालिफायर सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात बँगलोरने पंजाबवर १० षटके व ८ गडी राखून मात केली होती. तसेच गुणतालिकेतही बँगलोरचा संघ पहिल्या स्थानी तर पंजाबचा संघ दुसऱ्या स्थानी होता.
अहमदाबादमधील हवामान कसं असेल?
यंदाची आयपीएल फायनल अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवली जात आहे. अॅक्यूवेदरच्या अहवालानुसार रविवारी दुपारी अहमदाबादेत पावसाची शक्यता ६६ टक्के आहे. त्यामुळे क्रिकेटरसिक चिंतेत आहेत. तर, स्टेडियम परिसरात ३८ अंश सेल्सिअस तापमान असेल. दुपारी पावसाची शक्यता असली तर संध्याकाळी स्थिती सुधारेल. संध्याकाळी पावसाची केवळ ५ टक्के शक्यता आहे. मात्र, ३३ टक्के ढगाळ वातावरण असेल. यासह संध्याकाळी दव पडण्याची शक्यता आहे. ज्यामुळे दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघाला फायदा होऊ शकतो.
दरम्यान, संध्याकाळी पाऊस असल्यास सामन्याची वेळ पुढे ढकलली जाईल. सामना १२० मिनिटे पुढे ढकलला जाऊ शकतो. याआधी मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्ज हा सामना देखील पावसामुळे उशिरा सुरू झाला होता. यासह या सामन्यासाठी बीसीसीआयने एक दिवस राखीव ठेवला आहे.
एक दिवस राखीव
बीसीसीआयने या सामन्यासाठी १२० मिनिटे अधिकची दिली (बफर) आहेत. म्हणजेच नियमित वेळेनंतरही १२० मिनिटांपर्यंत सामना सुरू झाल्यास एकही षटक कमी न करता २०-२० षटकांचा सामना खेळवला जाईल. १२० मिनिटे झाल्यानंतर षटकं कमी करायला सुरूवात होईल. मात्र, आज पाऊस थांबलाच नाही व सामना सुरू होऊ शकला नाही तर हा सामना दुसऱ्या दिवशी म्हणजेच ४ जूनला खेळवला जाईल.