Rohit Sharma Reaction on Mitchell Santner Catch Video IPL 2025: रोहित शर्माने आपल्या एका खेळीने आयपीएल २०२५ मध्ये दणक्यात पुनरागमन केलं आहे. रोहित शर्मा स्पर्धेच्या सुरूवातीपासून मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरत होता. पण आता मात्र रोहितने चेन्नई सुपर किंग्सविरूद्ध ७६ धावांची मॅचविनिंग खेळी खेळत मुंबईला दणदणीत विजय मिळवून दिली. पण दरम्यान रोहित शर्माचा सामन्यातील एक व्हीडिओ व्हायरल होत आहे.
आयपीएल २०२५ मध्ये हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली रोहित शर्मा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळत आहे. रोहित शर्मा फक्त मुंबई इंडियन्ससाठी फलंदाजीला उतरतो. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यातही मुंबईचा संघ प्रथम गोलंदाजीला उतरला होता, त्यामुळे वानखेडे क्रिकेट स्टेडियमवर मुंबईच्या क्षेत्ररक्षणादरम्यान रोहित शर्मा डगआउटमध्ये बसला होता. यादरम्यान रोहितचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे.

चेन्नई सुपर किंग्सकडून या सामन्यात १७ वर्षीय मुंबईकर खेळाडू आयुष म्हात्रेने आयपीएलमध्ये पदार्पण केले. मुंबई इंडियन्सविरूद्धच्या सामन्यात त्याने शानदार फलंदाजी करत चेन्नईला पॉवरप्लेमध्ये चांगली धावसंख्या उभारून दिली. पण यादरम्यान फलंदाजी करताना तो मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात मिचेल सँटरनकडून झेलबाद झाला. तेव्हाचा हा व्हीडिओ आहे.

दीपक चहरच्या सातव्या षटकातील पाचव्या चेंडूवर आयुषने मोठा फटका मारला पण हा चेंडू मुंबई इंडियन्सच्या डगआऊटच्या समोर पडणार होता. तितक्यात तिथे तैनात असलेला मिचेल सँटनर धावत सीमारेषेजवळ आला आणि तो कठीण झेल टिपला. तो झेल टिपत असताना सँटरनचा तोल मागे जात होता आणि त्याने स्वत: सावरलं. तो पडताना दिसताच रोहित शर्माने जागेवर बसल्या ठिकाणी दोन्ही हात पुढे करत त्याला पकडण्याचा इशारा केला. रोहित जणू काही त्याला अरे थांब थांब पडशील असं म्हणत हात पुढे करत असल्याचं दिसत होतं.

रोहित शर्माच्या या प्रतिक्रियेचा व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे. आयुष म्हात्रे तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आल्यानंतर तुफानी फटकेबाजी करत होता. बाद होण्यापूर्वी त्याने १५ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांसह ३२ धावांची खेळी करत चेन्नईची धावसंख्या पॉवरप्लेमध्ये ५० च्या पार घेऊन गेला होता. मुंबईने वेळीच त्याला झेलबाद करत चेन्नईच्या धावांवर आळा घातला. त्यामुळे सँटरनचा तो झेल महत्त्वाचा ठरला आणि त्यावरची रोहितची प्रतिक्रियाही व्हायरल होत आहे.

सूर्यकुमार यादव आणि रोहित शर्माच्या ५४ चेंडूत ११४ धावांच्या भागीदारीच्या जोरावर सीएसकेने दिलेले १७७ धावांचे लक्ष्य अवघ्या १५.४ षटकांत गाठले आणि विजयाची हॅटट्रिक लगावली. यासह मुंबईचा संघ आता पॉवरप्लेमध्ये सहाव्या स्थानी पोहोचला आहे.