Rohit Sharma Statement After Winning POTM Award MI vs CSK IPL 2025: रोहित शर्मा आयपीएल २०२५ च्या सुरूवातीपासून खराब फॉर्मात होता. मुंबई इंडियन्स संघासाठी रोहितचा फॉर्म खूपच महत्त्वाचा होता. पण अखेरीस चेन्नई सुपर किंग्सविरूद्ध सामन्यात रोहित शर्मा आपल्या फॉर्मात परतला आणि मुंबईसाठी मॅचविनिंग खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. रोहितने या सामन्यात ४५ चेंडूत ४ चौकार आणि ६ षटकारांसह ७६ नाबाद धावा केल्या. यासह रोहित सामन्याचा सामनावीरदेखील ठरला. यानंतर रोहित शर्मा नेमकं काय म्हणाला, जाणून घेऊया.

रोहित शर्माला त्याच्या वादळी खेळीसाठी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. सामनावीर म्हणून रोहित शर्माचं नाव घोषित होताच वानखेडे स्टेडियममध्ये रोहित रोहित नावाचा जयजयकार दुमदुमला. फक्त मुंबई इंडियन्स नव्हे तर सीएसकेचे पिवळ्या जर्सीमधील चाहतेदेखील रोहितच्या नावाचा जयजयकार करताना दिसले.

रोहित चर्चा करण्यासाठी आला तेव्हा हर्षा भोगलेंनी रोहितला सांगितले की, सीएसकेचे चाहतेही त्याच्या नावाचा जयघोष करताना दिसत आहेत, यावर रोहित शर्मा म्हणाला, “हे क्रिकेटवर प्रेम करणारे चाहते आहेत आणि हिच वानखेडेची खासियत आहे. चाहत्यांना चांगल्या क्रिकेटचा आनंद घ्यायचा असतो आणि आमच्यासाठी आजचा सामना खूपच चांगला होता.”

रोहित शर्मा त्याच्या फॉर्मबद्दल बोलताना म्हणाला, “गेल्या कित्येक वर्षापासून क्रिकेट खेळत आहे. त्यामुळे फॉर्मात नसताना स्वत:वर शंका घेणं आणि अविश्वास दाखवत वेगळं काहीतरी ट्राय करणं ही खूप साधी गोष्ट आहे. पण माझ्यासाठी साध्या गोष्टी समजून घेत आणि योग्य विचार करणं महत्त्वाचं होतं. आपल्याला कसं खेळायचं आहे आणि खेळी कशी पुढे न्यायची आहे याचा विचार करणं खूप महत्त्वाचं असत.”

इम्पॅक्ट प्लेअर म्हणून रोहित शर्मा १५व्या किंवा १७व्या षटकात येतो, पण चेन्नईविरूद्ध सामन्यात तो थेट फलंदाजीला उतरला, याबद्दल रोहित म्हणाला, “आम्ही याबद्दल चर्चा केली, पण २-३ षटकांसाठी मैदानात येण्याने फारसा काही फरक पडत नाही. पण तुम्ही १७ षटकं फिल्डिंग केलेली नसते आणि अचानक मैदानावर येऊन फिल्डिंग करता हे सोपं नसतं. पण जर संघ व्यवस्थापनाला मी थेट फलंदाजीला यावं अशी इच्छा असेल तरीही मला चालेल.”

रोहित शर्माच्या नावाचं स्टॅन्ड वानखेडेच्या मैदानावर तयार होणार आहे. याबाबत रोहितने वक्तव्य केली आहेत. पण सामनावीर ठरल्यानंतर रोहित शर्माल पुन्हा याबाबत विचारण्यात आला, तेव्हा रोहित म्हणाला, “माझ्यासाठी ही खूप सन्मानाची गोष्ट आहे. मी याआधी सांगितलं की, लहान असताना एका वेळ अशी होती की, या स्टेडियममध्ये आम्हाला येण्याची परवानगीदेखील नव्हती. इतकी वर्ष या मैदानावर खेळल्यानंतर आता माझ्या नावाचं स्टॅन्ड इथे होणार आहे ही खरंच भावूक करणारी आणि सन्मानाची गोष्ट आहे. ते स्टॅन्ड तयार झाल्यावर मी पाहताना माझी प्रतिक्रिया काय असेल मला खरंच माहित नाही.”