RCB vs PBKS IPL 2025 Final Highlights: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने अखेरीस १८ वर्षांनी इंडियन प्रीमियर लीगचे जेतेपद पटकावले आहे. पंजाबचा संघ अहमदाबादच्या मैदानावर १९१ धावांचं लक्ष्य गाठण्यात अपयशी ठरला. तर संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आरसीबीच्या गोलंदाजांनी फायनलमध्येही भेदक गोलंदाजी करत संघाच्या विजयाचे हिरो ठरले. आयपीएल जेतेपदासह आरसीबीचा १८ वर्षांचा दुष्काळही संपला आहे.
पंजाब किंग्सला विजयासाठी अखेरच्या षटकात २९ धावांची गरज होती. शशांक सिंग मैदानात फलंदाजी करत कायम होता. जॉश हेझलवूडने अखेरचं षटक टाकलं. या अखेरच्या षटकात पहिले दोन चेंडू डॉट बॉल गेल्याने धावांचा फरक वाढला. नंतर शशांकने ३ षटकार आणि चौकार लगावला पण सामना हाताबाहेर गेला होता आणि अखेरीस आरसीबीने विजय मिळवला.
रजत पाटीदारच्या नेतृत्वाखालील बंगळुरूने रोमांचक अंतिम सामन्यात पंजाब किंग्जचा ६ धावांनी पराभव केला. यासह, संघ आयपीएल २०२५ चा विजेता बनला. कृणाल पंड्या, यश दयाल आणि भुवनेश्वर कुमार यांच्या संस्मरणीय स्पेलच्या जोरावर, बंगळुरूने १९० धावांचा स्कोअर डिफेंड केलाआणि सामना ६ धावांनी जिंकला. यासोबतच, संघाचा माजी कर्णधार आणि पहिल्या हंगामापासून संघाचा भाग असलेला विराट कोहली देखील अखेर आयपीएल चॅम्पियन बनला.
विराट कोहलीची १८ क्रमांकाची जर्सी आणि आय़पीएलच्या १८व्या वर्षी संघाने ट्रॉफी जिंकली आहे. विराट कोहली मैदानावरच ओक्साबोक्शी रडताना दिसला. आरसीबीने पंजाबला विजयासाठी १९१ धावांचे लक्ष्य दिले होते. यादरम्यान पंजाबची सुरूवात खूपच चांगली झाली. दोन्ही सलामीवीरांनी सुरूवातीच्या षटकांमध्ये चौकार-षटकार लगावले. तर आरसीबीकडून शेफर्डने तिसऱ्या षटकात झेल सोडला. पण पाचव्या षटकात हेझलवुडने संघाला पहिली विकेट मिळवून दिली, यासाठी फिल सॉल्टने एक कमालीचा झेल टिपला.
प्रियांश २४ धावा करत बाद झालाय यानंतर कृणाल पंड्याच्या फिरकीने पंजाबला धक्का दिला. स्पेलमधील पहिलं उत्कृष्ट षटक टाकल्यानंतर कृणालने दुसऱ्या षटकात प्रभसिमरनला २६ धावांवर झेलबाद केलं. यानंतर झेल सोडलेल्या रोमारियो शेफर्डला षटक टाकण्याची जबाबदारी दिली आणि त्याने श्रेयस अय्यरची मोठी विकेट मिळवून देत त्याने सोडलेल्या झेलची मोठी भरपाई केली. यानंतर कृणालने जोश इंग्लिसची विकेट घेत सामन्यात आरसीबीला कायम ठेवलं.
भुवनेश्वरने १७व्या षटकात दोन विकेट घेत पंजाबचं कंबरडं मोडलं. आधी त्याने नेहाल वधेराला झेलबाद केलं. त्यानंतर स्टॉयनिसने पहिल्या चेंडूवर षटकार लगावला आणि पुढच्या चेंडूवर झेलबाद झाला. यानंतर यश दयालने ओमरजाईला माघारी धाडलं. यानंतर शशांक सिंग मात्र ३० चेंडूत ३ चौकार आणि ६ षटकारांसह ६० धावा खेळत नाबाद माघारी परतला. अखेरच्या षटकातील पहिले दोन चेंडू खेळायला चुकल्यानंतर पुढच्या ४ चेंडूवर त्याने मोठे फटके लगावले, पण तोवर सामना हातातून निसटला होता आणि आरसीबीने सामना ६ धावांनी जिंकला.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने अंतिम फेरीत प्रथम फलंदाजी करताना ९ विकेट्स गमावताना १९० धावा केल्या. आरसीबीची सुरूवात फलंदाजीला चांगली झाली नव्हती. आरसीबीने पॉवरप्लेमध्येच फिल सॉल्टची विकेट गमावली. पॉवरप्लेमध्ये १ बाद ५५ धावा केल्या आहेत. विराट कोहलीने ३५ चेंडूत ३ चौकारांसह ४३ धावांची खेळी केली. तर मयंक अग्रवाल २४ धावा, रजत पाटीदार २६ धावा, लिव्हिंगस्टोन २५ धावा, जितेश शर्माने १० चेंडूत २ चौकार आणि २ षटकारांसह २४ धावांची खेळी केली. यासह आरसीबीने २० षटकांत १९० धावा केल्या आहेत.