scorecardresearch

IPL 2022 : “तो हिरो बनू शकला असता पण…”; रिंकू सिंहबद्दल कर्णधार श्रेयस अय्यरने व्यक्त केले मत

सामन्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने १५ चेंडूत ४० धावांची तुफानी खेळी करणाऱ्या रिंकू सिंहचे कौतुक केले

rinku sing
(फोटो सौजन्य – IPL)

बुधवारी रात्री कोलकाता नाईट रायडर्सला लखनऊ सुपर जायंट्सकडून २ धावांनी पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे केकेआरच्या प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्याच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज नंतर आयपीएल २०२२ मधून बाहेर पडणारा कोलकाता हा तिसरा संघ ठरला आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना लखनौने कोलकातासमोर २११ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते, केकेआर संघ निर्धारित २० षटकात २०८ धावाच करू शकला. सामन्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने १५ चेंडूत ४० धावांची तुफानी खेळी करणाऱ्या रिंकू सिंहचे कौतुक केले.

सामन्यानंतर श्रेयस अय्यर म्हणाला, “मला अजिबात दुःख होत नाही. मी खेळलेल्या क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळांपैकी हा एक होता. आपण ज्या प्रकारे आपली वृत्ती ठेवली पाहिजे त्याप्रमाणे ती सर्वोत्तम होती. रिंकूने ज्या पद्धतीने आम्हाला शेवटपर्यंत नेले ते मला खूप आवडले, पण दुर्दैवाने योग्य वेळेवर चेंडू खेळू शकला नाही, तो खूप दुःखी होता. मी अपेक्षा करत होतो की तो आमच्यासाठी सामना पूर्ण करेल आणि हिरो होईल पण त्याने एक उत्तम खेळी खेळली आणि मी त्याच्यासाठी खूप आनंदी आहे.”

दरम्यान,कोलकाता नाईट रायडर्सला हंगामाच्या शेवटपर्यंत त्यांची अचूक प्लेइंग इलेव्हन सापडली नाही. सलामीवीरांपासून ते गोलंदाजांपर्यंत संपूर्ण मोसमात संघाने अनेक बदल केले. आयपीएल २०२२ मध्ये सर्वात जास्त बदल करणारा संघ कोलकाता नाईट रायडर्सचा होता.

या मुद्द्यावर केकेआरचा कर्णधार म्हणाला, “आमच्यासाठी हा खडतर हंगाम होता. आम्ही चांगली सुरुवात केली पण सलग पाच सामने गमावले आणि मला वैयक्तिक वाटते की आम्ही खूप बदल केले आहेत. आम्हांला फॉर्ममुळे हे करावे लागले. त्यामुळे आम्हाला रिंकू सारख्या खेळाडूची ओळख झाली.”

दरम्यान, कोलकाता नाईट रायडर्सला शेवटच्या तीन षटकात ५५ धावांची गरज होती, मात्र त्यांना ५३ धावा करता आल्या. रिंकू सिंहने अशी काही खेळी खेळली, जी वर्षातून एकदा खेळली जाते पण तो आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. रिंकू सिंहने १५ चेंडूत २ चौकार आणि ४ षटकारांसह ४० धावा केल्या.

कोलकाता नाईट रायडर्सला शेवटच्या षटकात २१ धावांची गरज होती आणि रिंकू सिंह क्रीजवर होता. लखनऊकडून मार्कस स्टॉइनिसने चेंडू हातात घेतला आणि शेवटच्या षटकात त्याने २ बळी घेतले आणि १८ धावा दिल्या.

मराठीतील सर्व आयपीएल २०२२ ( Ipl ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shreyas iyer not sad despite being out of ipl 2022 said about rinku singh abn