Suryakumar Yadav Statement on Wife After Winning POTM Award: मुंबई इंडियन्सने वानखेडेच्या मैदानावर दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करत आयपीएल २०२५ च्या प्लेऑफमध्ये धडक मारली आहे. मुंबई इंडियन्सने सूर्यकुमार यादव, नमन धीर, मिचेल सँटनर आणि जसप्रीत बुमराह यांच्या उत्कृष्ट खेळीच्या जोरावर संघाने दिल्लीवर ५९ धावांनी मोठा विजय मिळवला. या विजयानंतर सूर्यकुमार यादवला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. यादरम्यान सूर्याने त्याच्या पत्नीने सकाळी सांगितलेली एक गोष्ट सांगितली, जी त्याने या सामन्यात पूर्ण केली.
सूर्यकुमार यादवने ४३ चेंडूत ७ चौकार आणि ४ षटकारांसह सर्वाधिक ७३ धावा केल्या आणि नाबाद परातला. तर रायन रिकेल्टन (२५), विल जॅक्स (२१), तिलक वर्मा (२७) आणि नमन धीर (नाबाद २४) यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. परिणामी मुंबईने पाच विकेट्स गमावत १८० धावा केल्या. प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्सचा संघ १८.२ षटकांत १२१ धावांवर गारद झाला, ज्यामध्ये समीर रिझवीने ३५ चेंडूत ३९ धावा करत सर्वाधिक धावा केल्या.
सामन्यानंतर मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी वानखेडेवर चाहत्यांचे आभार मानले. मुंबईचा यंदाच्या लीग स्टेजमधील वानखेडेवरील घरच्या मैदानावर अखेरचा सामना होता. यामध्ये विजय मिळवत त्यांनी प्लेऑफ गाठलं. दरम्यान पोस्ट मॅच प्रेझेंटेशन सेरेमनी सुरू असताना पावसाने हजेरी लावली.
सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी सूर्यकुमार यादव छत्री घेऊन आला होता, यादरम्यान बोलताना सूर्यकुमार यादव म्हणाले की, “आतापर्यंत १३ सामने खेळले गेले आहेत. माझ्या पत्नीने आज मला एक सुंदर गोष्ट सांगितली. ती म्हणाला की, सर्व पुरस्कार मिळाले आहेत, पण मॅन ऑफ द मॅच पुरस्कार मिळालेला नाही. त्यामुळे आजचा हा पुरस्कार खास आहे. संघाच्या दृष्टिकोनातून ही खेळी महत्त्वाची होती आणि ही ट्रॉफी देखील तिच्यासाठी आहे. ती अशा क्षणांची वाट पाहत असते आणि आम्ही ते क्षण साजरे करतो.”
सूर्या खेळीबाबत बोलताना पुढे म्हणाला, “कोणत्यातरी एका फलंदाजाने शेवटपर्यंत फलंदाजी करणं महत्त्वाचे होतं. आम्हाला माहित होतं की कुठेतरी १५-२० धावांचं एक षटक येणार, म्हणून आम्हाला शेवटपर्यंत वाट पहावी लागली. नमनने ज्या पद्धतीने फटकेबाजी केली ते पाहून माझ्यातही त्याची ऊर्जा आली आणि तो देखील एक टर्निंग पॉइंट होता.”
मुंबईने त्यांच्या घरच्या मैदान वानखेडेवर दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध विजय मिळवताच आयपीएल २०२५ प्लेऑफमध्ये जाणारे चार संघ निश्चित झाले. ज्यामध्ये गुजरात, आरसीबी, पंजाब नंतर आता मुंबई इंडियन्सनेही आपले स्थान मिळवले. सध्या लीग टप्प्यातील सर्व सामने न झाल्याने कोणता संघ क्वालिफायन एलिमिनेटर खेळणार हे अजून निश्चित झालेलं नाही.