IPL 2025 Vaibhav Suryavanshi Touches MS Dhoni Feet Video: राजस्थान रॉयल्सने आयपीएल २०२५ च्या अखेरच्या सामन्यात शानदार विजय मिळवत मोहिमेचा शेवट केला आहे. राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्सचा ६ विकेट्स १७ चेंडू बाकी ठेवत शानदार विजय मिळवला. राजस्थानच्या या विजयात संपूर्ण संघाचं योगदान होतं. पण वैभव सूर्यवंशीच्या फलंदाजीने सर्वांचं पुन्हा एकदा लक्ष वेधून घेतलं. पण याशिवाय वैभवच्या कृतीमुळे सर्वच जण त्याचं कौतुक करत आहेत.
राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांनी पहिल्या डावात चेन्नईच्या फलंदाजांवर वचक बसवला आणि त्यांना २०० धावांपर्यंत पोहोचू दिले नाही.चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना १८७ धावा केल्या. चेन्नईने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानने संथ सुूरूवात केली. यशस्वीने एकाबाजूने फटकेबाजी केली, पण षटकारांची आतिषबाजी करणारा वैभव सूर्यवंशी शांत होता आणि त्याने या सामन्यात संथ सुरूवात करत नंतर आपलं रौद्ररूप दाखवलं.
यशस्वी जैस्वाल बाद झाल्यानंतर वैभव सूर्यवंशीने संजू सॅमसनच्या जोडीने संघाचा डाव सावरला. वैभव सूर्यवंशीने या सामन्यात ३३ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांसह ५७ धावा करत अर्धशतक झळकावलं. राजस्थानला विजयाच्या उंबरठ्यावर आणण्यात संजूबरोबर वैभवनेही मोठं योगदान दिलं. अखेरीस ध्रुव जुरेलने षटकारांची आतिषबाजी करत संघाला विजय मिळवून दिला आणि विजयासह मोहिमेची सांगता केली.
सामना संपल्यानंतर, जेव्हा दोन्ही संघांचे खेळाडू हस्तांदोलन करत होते, तेव्हा धोनी आणि वैभवही समोरासमोर आले. धोनी जवळ येताच, वैभवने एका हाताे हस्तांदोलन करत धोनीच्या पायांना खाली वाकून स्पर्श केला आणि त्याचे आशीर्वाद घेतले. यानंतर, धोनीने वैभवकडे प्रेमाने पाहत त्याचं कौतुक केलं आणि वैभवनेही निरागस स्मितहास्य दिलं, वैभवच्या या कृतीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आणि या क्षणाचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.
समालोचन करत असलेले हरभजन सिंग, नवज्योत सिंग सिद्धूदेखील वैभवची ही कृती पाहून त्याचं मनापासून कौतुक करताना दिसले. वैभववर केलेले संस्कार आणि भारतीय संस्कार यांच्याबाबतही वक्तव्य करत त्यांनी वैभवचं कौतुक केलं.