Virat Kohli broke Shikhar Dhawan’s half century record : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फलंदाज विराट कोहलीने पंजाब किंग्जविरुद्ध अर्धशतकी खेळी खेळून अनेक विक्रम आपल्या नावावर केले. कोहलीने ७७ धावांच्या खेळीत ११ चौकार आणि २ षटकार मारले. कोहलीच्या या खेळीच्या मदतीने, फाफ डुप्लेसिसच्या नेतृत्वाखालील आरसीबीने पंजाबचा पराभव केला आणि आयपीएल २०२४ मध्ये पहिला विजय नोंदवला. या सामन्यात विराट कोहलीने शिखर धवनचा एक विक्रम मोडला. त्याचबरोबर त्याने महेंद्रसिंग धोनीच्या एका विक्रमाशी बरोबरी साधली.

आयपीएलमध्ये सर्वाधिक अर्धशतके करणारा तो भारतीय ठरला –

विराट कोहलीने पंजाबविरुद्ध आयपीएलमधील ५१ वे अर्धशतक झळकावले. यासह तो या स्पर्धेत सर्वाधिक अर्धशतक ठोकणारा भारतीय फलंदाज ठरला. या प्रकरणात कोहलीने शिखर धवनला मागे सोडले ज्याच्या नावावर आयपीएलमध्ये ५० अर्धशतके आहेत. विशेष म्हणजे शिखर धवनच्या नेतृत्वाखाली पंजाबविरुद्ध कोहलीने ही कामगिरी केली. मात्र, आयपीएलमध्ये सर्वाधिक अर्धशतके झळकावण्याचा एकूण विक्रम दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरच्या नावावर आहे. वॉर्नरने या स्पर्धेत आतापर्यंत ६१ अर्धशतके झळकावली आहेत. कोहली आणि वॉर्नरमध्ये १० अर्धशतकांचा फरक आहे.

आयपीएलमध्ये सर्वाधिक अर्धशतके झळकावणारे फलंदाज –

डेव्हिड वॉर्नर – ६१
विराट कोहली – ५१
शिखर धवन – ५०
रोहित शर्मा – ४२
एबी डिव्हिलियर्स – ४०

विराटने धोनीच्या विक्रमाशी साधली बरोबरी –

पंजाबविरुद्ध खेळलेल्या शानदार अर्धशतकी खेळीसाठी विराट सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. कोहलीला यंदाच्या मोसमात पहिल्यांदाच हा पुरस्कार मिळाला आहे. कोहलीचा हा आयपीएलमधील १७वा सामनावीर पुरस्कार होता. त्याने हा पुरस्कार सर्वाधिक वेळा जिंकण्यात चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची बरोबरी केली आहे. कोहली आणि धोनीच्या पुढे मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा आहे, ज्याने १९ वेळा सामनावीराचा पुरस्कार पटकावला आहे.

हेही वाचा – IPL 2024: पंजाबने ‘चुकून’ खरेदी केलेल्या शशांकची सिंगची ८ चेंडूत २१ धावांची वादळी खेळी, वाचा लिलावात नेमकं काय झालं होतं?

आयपीएलमधील सर्वाधिक सामनावीर पुरस्कार जिंकणारे फलंदाज –

एबी डिव्हिलियर्स -२५
ख्रिस गेल – २२
रोहित शर्मा – १९
डेव्हिड वॉर्नर – १८
विराट कोहली – १७
महेंद्रसिंग धोनी – १७

हेही वाचा – IND vs AUS Test : भारत-ऑस्ट्रेलिया बॉर्डर गावसकर ट्रॉफीचे वेळापत्रक जाहीर, ‘या’ मैदानांवर खेळले जाणार पाच सामने

ऑरेंज कॅपच्या शर्यतीतही कोहली आघाडीवर –

पंजाबविरुद्ध खेळलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर आरसीबीचा फलंदाज कोहली या मोसमात ऑरेंज कॅपच्या शर्यतीत पुढे गेला आहे. आयपीएलच्या चालू मोसमात कोहलीने दोन सामन्यांत ९८ धावा केल्या आहेत. दुसऱ्या स्थानावर पंजाब किंग्जचा सॅम करन आहे ज्याने दोन सामन्यात ८६ धावा केल्या आहेत. सध्या कोहली आणि करणमध्ये १२ धावांचा फरक आहे. त्याचबरोबर राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन ८२ धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे. मात्र, सॅमसन एकच सामना खेळला आहे.