चेन्नईने कोलकाताविरुद्धच्या लढतीत अंशुल कंबोजला अंतिम अकरात संधी दिली आहे. चेन्नईला सामने जिंकण्यात सातत्याने अपयश येत आहे. ऋतुराज गायकवाड कोपऱ्याला झालेल्या दुखापतीमुळे उर्वरित हंगाम खेळू शकणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. महेंद्रसिंग धोनी पुन्हा कर्णधार होताच अंशुल कंबोजला संधी मिळाली आहे. कोण आहे हा अंशुल कंबोज? त्याला संधी मिळावी अशी चर्चा सातत्याने सोशल मीडियावर का होते आहे ते जाणून घेऊया.

गेल्या वर्षी, १५ नोव्हेंबर २०२४ रोजी हरयाणाकडून खेळणाऱ्या अंशुल कंबोजने एका डावात १० पैकी १० विकेट्स घेत नवा विक्रम रचला होता. केरळ संघाविरुद्ध रोहतक सुरू असलेल्या लढतीत अंशुलने शॉन रॉजरला बाद करत डावातील सगळ्या विकेट्स पटकावण्याचा मान मिळवला. रणजी करंडक स्पर्धेत एका डावात १० विकेट्स घेणारा तो केवळ तिसरा गोलंदाज ठरला होता. १९५६-५७ मध्ये प्रेमांग्सू चॅटर्जी यांनी तर प्रदीप सुदरमन यांनी १९८५-८६ मध्ये १० विकेट्स घेण्याची करामत केली होती.

भारतात प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एका डावात १० पैकी १० विकेट्स पटकावण्याचा मान सुभाष गुप्ते, अनिल कुंबळे आणि देबाशीष मोहंती यांनी पटकावला होता. शुक्रवारी खेळ सुरू झाला तेव्हा विक्रमासाठी अंशुलला २ विकेट्सची आवश्यकता होती. तीन षटकात २ विकेट्स घेत अंशुलने दुर्मीळ विक्रम नावावर केला. ३०.१ षटकात ९ निर्धाव षटकांसह ४९ धावांच्या मोबदल्यात अंशुलने १० विकेट्स पटकावल्या. केरळ संघात बाबा अपराजित, रोहन कन्नूमल, सचिन बेबी, जलाज सक्सेना अशा अनुभवी फलंदाजांचा समावेश होता. पण अंशुलच्या भेदक माऱ्यासमोर केरळच्या सर्वच फलंदाजांनी शरणागती पत्करली.

२०२२ मध्ये अंशुलने हरयाणासाठी खेळायला सुरुवात केली. २०२३-२४ हंगामात विजय हजारे स्पर्धेत अंशुल हरयाणासाठी सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अग्रस्थानी होता.

यंदाच्या वर्षीच अंशुलने आयपीएल स्पर्धेत पदार्पण केलं होतं. मुंबई इंडियन्स संघाने त्याला ताफ्यात समाविष्ट केलं होतं. दोन सामन्यात त्याला खेळायची संधी मिळाली. अंशुलने आपल्या गोलंदाजीने चाहत्यांना प्रभावित केलं होतं. ग्लेन मॅकग्रा हा अंशुलचा आदर्श आहे. हरयाणातलं करनाल हे अंशुलचं गाव. बॉक्सिंगपटूंसाठी हे गाव प्रसिद्ध आहे. १४व्या वर्षी त्याने क्रिकेटवरच लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला. देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करणाऱ्या अंशुलने आगामी आयपीएल लिलावाच्या पार्श्वभूमीवर दमदार कामगिरीसह फ्रँचाइजींना आपली दखल घेण्यास भाग पाडलं आहे.

आयपीएल पदार्पण

६ मे २०२४ रोजी अंशुलने मुंबई इंडियन्ससाठी पदार्पण केलं. अंशुल कंबोजने पदार्पणाच्या सामन्यात पहिली विकेटही मिळवली. अंशुलच्या नावे पदार्पणाच्या सामन्यातच ३ विकेट्सही झाले असते, तर हेडला क्लीन बोल्ड करणारा गोलंदाज अशीही त्याची ओळख होता होता राहिली

पदार्पणाच्या सामन्यात प्रत्येक गोलंदाज आपल्या खेळीने छाप पाडण्याचा प्रयत्न करतो, अंशुलनेही आजच्या सामन्यात अगदी तेच केलं, त्याला पहिली विकेट मिळाली खरी पण त्याच्या दोन मोठ्या विकेट्स हुकल्यानंतरच. अंशुलने त्याच्या दुसऱ्या षटकातील पाचव्या चेंडूवर हेडला क्लीन बोल्ड केले. पण अंशुलचं नशीब खराब म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण तो नो बॉल ठरला आणि अंशुलला मोठी विकेट मिळता मिळता राहिली. त्यानंतर त्याच्या पुढील षटकात पुन्हा एकदा हेडला झेलबाद करण्याची संधी आली. हेडने त्याच्या चेंडूवर थर्ड मॅनवर षटकार लगावला. तिथे तुषारा हजर होता पण त्याने मात्र झेल सोडला. अशारितीने हेड नाबाद राहिला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पण अंशुलने त्याच्या पुढील षटकात मयंक अग्रवालला क्लीन बोल्ड करत आपली पहिली विकेट मिळवली. आयपीएलमधील पहिली विकेट मिळवल्याचं त्याने शानदार सेलिब्रेशन केलं.