Yash Thakur and Yash Dhull Fight video: ईरानी कप २०२५ सामन्यात भारताच्या दोन्ही खेळाडूंमध्ये मोठा वाद पाहायला मिळाला. विदर्भ आणि शेष भारत यांच्यातील इराणी कप सामना हाणामारीच्या चर्चेत संपला. नागपूरमध्ये झालेल्या सामन्याच्या शेवटच्या दिवशी रणजी ट्रॉफी विजेत्या विदर्भाने शेष भारताचा ९३ धावांनी पराभव करून विजेतेपद पटकावले.
ईरानी कप सामन्यादरम्यान तरुण भारतीय खेळाडूंमध्ये मोठा वाद झाला. परिस्थिती शारीरिक हाणामारीच्या उंबरठ्यावर असल्यासारखी वाटत होती. विदर्भाचा वेगवान गोलंदाज यश ठाकूर आणि शेष भारताचा फलंदाज यश धुल यांच्यात हा वाद झाला.
रविवार, ५ ऑक्टोबरला नागपूरमध्ये इराणी कप जेतेपदाच्या लढतीचा शेवटचा दिवस होता. शेष भारत ३६१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत होता, पण संघ लागोपाठ विकेट्स गमावत होता. त्या क्षणी, दिल्लीचा तरुण फलंदाज यश धुल क्रीजवर खंबीरपणे उभा होता. त्याने विदर्भाच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला आणि मानव सुथारबरोबर शानदार शतकी भागीदारी करून विजयाच्या आशा पल्लवित ठेवल्या.
ईरानी कप यश धुल-यश ठाकूरमध्ये मोठा वाद
यळ धुल उत्कृष्ट फॉर्मात दिसत होता आणि शतकाच्या दिशेने जात चांगली फलंदाजी करत होता. पण ९२ धावांवर त्याला यश ठाकूरने धक्का देत माघारी धाडलं. ६३ व्या षटकात विदर्भाचा वेगवान गोलंदाज यश ठाकूरने टाकलेल्या पहिल्या चेंडूवर यश धुलने (९२) अप्पर कट खेळण्याचा प्रयत्न केला पण थर्ड मॅन बाउंड्रीवर तो झेलबाद झाला.
क्षेत्ररक्षकाने झेल घेताच, गोलंदाज यश ठाकूर विकेटचा आनंद साजरा करू लागला. पण नंतर तो थेट धुलच्या जवळ गेला आणि आक्रमक वृत्तीने विकेटचं सेलिब्रेशन करताना दिसला. यश धुलला ठाकूरचं हे अशा पद्धतीने सेलिब्रेशन करणं आवडलं नाही आणि त्याने प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. काहीच मिनिटांत दोघांमध्ये मोठा वाद सुरू झाला.
विशेषतः यश ठाकूर हा संतापून बोलत असल्याचं दिसून आलं आणि क्षणभर असं वाटलं की दोघांमध्ये शारीरिक हाणामारी होईल, पण त्याआधी पंच आणि विदर्भ संघातील इतर खेळाडूंनी गोलंदाजाला मागे घेत वाद थांबवला. पण तथापि, तरीही तो शांत झाला नाही आणि पुन्हा जात असताना धुलला काहीतरी बोलत असल्याचे दिसून आलं. पण यश धुल नंतर मैदानाबाहेर निघाला आणि त्यानंतरच परिस्थिती शांत झाली.