Gautam Gambhir And The Oval Pitch Curator Controversy: भारत आणि इंग्लंड यांच्यातील द ओव्हल येथे होणाऱ्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्याच्या तयारीला अनपेक्षित वळण मिळाले असून, भारताचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि पिच क्युरेटर ली फोर्टिस यांच्यात झालेल्या बाचाबाचीमुळे सोशल मीडियावरही याचे पडसाद पाहायला मिळाले. मंगळवारी भारताच्या सराव सत्रादरम्यान झालेल्या या वादाची सुरुवात खेळपट्टीच्या पाहणीवरून झालेल्या मतभेदांमुळे झाली असल्याचे वृत्त आहे.
दरम्यान, या वादाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामध्ये गौतम गंभीर स्पष्टपणे चिडलेला दिसत आहे. तो फोर्टिस यांच्याकडे बोट दाखवत ओरडताना दिसतो आणि “तुम्ही आम्हाला काय करायचे आहे ते सांगू शकत नाही”, असे म्हटल्याचे ऐकू येत आहे. त्यानंतर यामध्ये भारताचे फलंदाजी प्रशिक्षक सीतांशू कोटक यांना हस्तक्षेप करावा लागला. त्यांनी ली फोर्टिस यांना बाजूला करत तणाव कमी केला.
या वादात आणखी भर घालत भारताचा माजी अष्टपैलू इरफान पठाणने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एका पोस्टमध्ये द ओव्हलचे क्युरेटर ली फोर्टिस यांचे हे वागणे दुटप्पीपणाचे उदाहरण असल्याचे म्हटले आहे.
या वादानंतर इंग्लंडचा मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलमचा एक जुना फोटो व्हायरल होत आहे. यामध्ये मॅक्युलम क्युरेटर ली फोर्टिस यांच्यासोबत खेळपट्टीवर उभा राहून त्याची मुक्तपणे पाहणी करताना दिसतो.
या व्हायरल फोटोवर प्रतिक्रिया देताना इरफान पठाणने म्हटले की, “तर मग एक इंग्लिश प्रशिक्षक खेळपट्टीवर जाऊन खेळपट्टीची पाहणी करू शकतो? पण एक भारतीय प्रशिक्षक करू शकत नाही? आपण अजूनही गुलामगिरीच्या काळात अडकलो आहोत का?”
दरम्यान, इरफान पठाणच्या या पोस्टने अनेक चाहते आणि माजी खेळाडू प्रभावित झाले असून, त्यांनीही याविरोधात आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे.
घडलेल्या या प्रकाराला फारसे महत्त्व न देता क्युरेटर ली फोर्टिस यांनी गौतम गंभीर “थोडा संवेदनशील” असे म्हणत अधिक तपशील देण्याचे टाळले. जेव्हा त्यांना या वादाचे कारण विचारले, तेव्हा ते म्हणाले, “ते तुम्हाला गंभीरला विचारावे लागेल. आमच्याकडे लपवायसारखे काहीच नाही.”
भारत सध्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-१ ने पिछाडीवर असून, ओल्ड ट्रॅफर्डमध्ये सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवल्यानंतर अंतिम कसोटी जिंकत मालिका बरोबरीत आणण्याची संधी भारताकडे आहे.