Dav Whatmore criticised Hardik Pandya absence from domestic cricket : भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्यासाठी वैयक्तिक आणि व्यावसायिक आघाडीवर परिस्थिती ठीक नाही. एकीकडे त्याने पत्नी नताशा स्टॅनकोविचपासून घटस्फोट घेतला आणि दुसरीकडे भारतीय टी-२० संघाच्या कर्णधारपदाच्या शर्यतीत तो सूर्यकुमार यादवपेक्षा मागे पडला. बीसीसीआयही हार्दिकच्या फिटनेसबाबत चिंतेत आहे. अशा परिस्थितीत हार्दिक आगामी विजय हजारे करंडक स्पर्धेत बडोद्याकडून खेळताना दिसण्याची शक्यता आहे. अशात आता बडोद्याचे माजी प्रशिक्षक डेव्ह व्हॉटमोर यांनी हार्दिकवर अनेक वर्षे देशांतर्गत क्रिकेट खेळत नसल्याने टीका केली आहे.

बीसीसीआय हार्दिकच्या फिटनेसवर लक्ष ठेवणार –

निवडसमितीचे अध्यक्ष अजित आगरकर आणि भारतीय संघाचे नवनियुक्त मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी सूर्यकुमारकडे कर्णधारपद सोपवण्याचा निर्णय घेतला होता. हे दोघेही हार्दिकच्या तंदुरुस्तीबद्दल चिंतित आहेत. त्यांना टीम इंडियासाठी असा कर्णधार हवा आहे, जो दीर्घकाळ संघात राहू शकेल. त्यामुळे वनडे फॉरमॅटसाठी बीसीसीआय हार्दिक पंड्याच्या फिटनेसवर लक्ष ठेवणार आहे. २०१८ पासून हार्दिकने त्याच्या घरच्या संघ बडोद्याकडून एकही सामना खेळलेला नाही. त्यामुळे तो विजय हजारे ट्रॉफीमध्ये आपल्या संघाचे प्रतिनिधित्व करू शकतो, अशी माहिती आहे.

‘मला आश्चर्य वाटते की…’

पाक पॅशन यूट्यूब चॅनलवर व्हॉटमोर म्हणाले, “अजूनही काही खेळाडू असे आहेत, जे मर्यादीत षटकातील क्रिकेट खेळत नाहीत. उदाहरणार्थ, बडोद्यात माझ्या गेल्या काही वर्षांत, हार्दिक पंड्याने मर्यादित षटकांचे क्रिकेट खेळले नाही. यामुळे मला नेहमीच आश्चर्य वाटते की त्याला बडोद्याचा अष्टपैलू खेळाडू म्हटले जाते, पण तो बडोद्यासाठी अनेक वर्षांपासून खेळलेला नाही. होय, असे काही लोक आहेत जे खेळत नाहीत. अलीकडेच मी पाहिले की बीसीसीआयने खेळाडूंना रणजी ट्रॉफीसह इतर देशांतर्गत क्रिकेट लीगमध्ये खेळायला सांगितले आहे. चार दिवसीय क्रिकेटकडे दुर्लक्ष होऊ नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत. हे चार दिवसीय क्रिकेटकडे दुर्लक्ष होऊ नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत.”

हेही वाचा – Paris Olympics 2024 : ऑलिम्पिकच्या इतिहासात ‘या’ देशांनी पटकावलीत सर्वाधिक सुवर्णपदकं, जाणून घ्या कोण आहेत टॉप-५ देश?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टी-२० विश्वचषकात हार्दिक पंड्याचे दमदार प्रदर्शन –

गेल्या महिन्यात अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत हार्दिकची कामगिरी प्रशंसनीय होती. त्याने भारताच्या विजेतेपदात महत्त्वाची भूमिका बजावली होती. हार्दिक आता २७ जुलैपासून श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत भाग घेणार आहे. हार्दिकने भारतीय संघासोबत श्रीलंका गाठली असून मंगळवारी सराव सत्रातही भाग घेतला. मात्र, त्याने वनडे मालिकेतून माघार घेतली आहे.