मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) अध्यक्षपदासाठी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्यात थेट सामना होणार असल्याचे बुधवारी स्पष्ट झाले आहे. परंतु विजय पाटील यांचे ‘क्रिकेट फर्स्ट’, रवी सावंत यांच्या नेतृत्वाखालील बाळ म्हाडदळकर गट आणि प्रा. रत्नाकर शेट्टी गट अशा तिन्ही गटांचे पाठबळ लाभल्यामुळे पवार यांचे पारडे मुंडे यांच्यापेक्षा जड मानले जात आहे. मात्र अध्यक्षपद वगळल्यास एमसीएवर वर्चस्व सिद्ध करण्यासाठी तिन्ही गटांमध्ये चुरस दिसत आहे.
‘‘शरद पवार यांचे अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र सादर झाले आहे,’’ अशी माहिती एमसीएचे संयुक्त सचिव पी. व्ही. शेट्टी यांनी दिली. पवार हे पारसी पायोनीअर क्रिकेट क्लबचे प्रतिनिधित्व आहेत. मंगळवारी मुंडे यांनी अध्यक्षपदाचा अर्ज भरल्यामुळे आता त्यांचा थेट सामना पवारांशी होणार आहे.
पवार यांनी २०११मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) अध्यक्षपदाचा कार्यकाळ पूर्ण केला. ते २००५-०६ ते २००७-०८पर्यंत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी विराजमान होते. याप्रमाणे पवार यांनी एमसीएच्या अध्यक्षपदावरही २००१-०२ ते २०१०-११ अशी दहा वष्रे राज्य केले. २०११मध्ये त्यांच्या पाठिंब्यावरच विलासराव देशमुख अध्यक्षपदावर निवडून आले. परंतु देशमुख यांच्या निधनामुळे २०१२मध्ये रवी सावंत यांच्याकडे अध्यक्षपद चालून आले.
पवारांचे दोन गटांकडून अर्ज
पवार यांच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी प्रत्यक्षात मात्र दोन गटांकडून वेगवेगळे उमेदवारी अर्ज एमसीए कार्यालयात दाखल झाले आहेत. यापैकी म्हाडदळकर गटाच्या अर्जावर पी. व्ही. शेट्टी सूचक व एमसीएचे अध्यक्ष रवी सावंत अनुमोदक आहेत. तर क्रिकेट फर्स्ट गटाच्या अर्जावर विजय पाटील सूचक आणि नदीम मेमन अनुमोदक आहेत.
शेट्टी यांचा गट मात्र रिंगणात
मुंबई उच्च न्यायालयाने एमसीएच्या नियमांना स्थगिती देण्यास नकार दिल्यामुळे बीसीसीआयचे खेळ विकास महाव्यवस्थापक प्रा. रत्नाकर शेट्टी यांना एमसीएची निवडणूक लढविता येणार नाही. परंतु शेट्टी यांचा गट मात्र ही निवडणूक लढणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. शेट्टी यांच्या गटाकडून काही जागांसाठी उमेदवारी दाखल केली जाणार आहे, याविषयी दुजोरा मिळत आहे.
आशिष शेलार यांची माघार
मुंबई भाजपचे प्रदेशाध्यक्ष अॅड. आशिष शेलार यांनी एमसीए निवडणुकीतून माघार घेतली आहे. शेलार यांचे रवी म्हाडदळकर गटातून नाव जाहीर झाले होते. परंतु मंगळवारी शेलार यांनी भाजपचे अध्यक्षपदाचे उमेदवार गोपीनाथ मुंडे यांच्या नामनिर्देशन पत्रावर सूचक म्हणून नाव दिले होते. शेलार यांनी पक्षाला प्राधान्य देत निवडणुकीतून माघार घेतल्याचे म्हटले जात आहे.