नवी दिल्ली : पाठीच्या दुखापतीमुळे ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला मुकावे लागण्याची मला खंत आहे. मात्र, या स्पर्धेदरम्यान भारतीय संघाला माझे पूर्ण समर्थन असेल, असे वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा मंगळवारी म्हणाला.

जायबंदी बुमरा ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषकाला मुकणार असल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सोमवारी अधिकृतरीत्या जाहीर केले होते. बुमराची सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम गोलंदाजांमध्ये गणना केली जाते. त्यामुळे तो विश्वचषकात खेळू न शकणे भारतासाठी मोठा धक्का मानला जातो आहे.

‘‘ट्वेन्टी-२० विश्वचषकात खेळता येणार नसल्याची मला खंत आहे. मात्र, तुमच्या शुभेच्छा, तुम्ही दाखवलेली काळजी आणि दिलेले पाठबळ याबद्दल मी तुम्हा सर्वाचा आभारी आहे. आता दुखापतीतून सावरतानाच मी भारतीय संघाला समर्थन दर्शवत राहीन,’’ असे बुमराने ‘ट्वीट’मध्ये लिहिले.

पाठीच्या दुखापतीमुळेच बुमराला गेल्या महिन्यात झालेल्या आशिया चषक स्पर्धेलाही मुकावे लागले. बुमरा ट्वेन्टी-२० विश्वचषकात खेळणार नसल्याचे जाहीर करण्यात आले असले, तरी भारतीय संघात त्याची जागा कोण घेणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. नुकताच करोनामुक्त झालेला मोहम्मद शमी आणि दीपक चहर या वेगवान गोलंदाजांची भारतीय संघात राखीव खेळाडू म्हणून निवड झाली आहे. या दोघांसह मोहम्मद सिराजबाबत निवड समिती सध्या विचार करत असल्याची माहिती आहे.

१६ ऑक्टोबरपासून ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या प्राथमिक फेरीला सुरुवात होणार असून ‘अव्वल १२’ फेरीचे सामने २२ ऑक्टोबरपासून होतील. भारताचा सलामीचा सामना २३ ऑक्टोबरला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी नितिन मेनन पंच दुबई : ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी १६ पंचांची यादी मंगळवारी जाहीर करण्यात आली आणि यात भारताच्या नितिन मेनन यांचाही समावेश होता. ‘आयसीसी’च्या विशेष पंच श्रेणीतील (एलिट पॅनल) एकमेव भारतीय पंच असलेले मेनन ऑस्ट्रेलियात दाखल झाले आहेत. १६ ऑक्टोबरला श्रीलंका आणि नामिबिया यांच्यात होणाऱ्या सलामीच्या लढतीत जोएल विल्सन आणि रॉड टकर हे पंचांची भूमिका बजावतील. या स्पर्धेसाठी अँडी पायक्रॉफ्ट, ख्रिस ब्रॉड, डेव्हिड बून आणि रंजन मदूगले यांची सामनाधिकारी म्हणून निवड झाली आहे.