गेल्या काही वर्षांमध्ये जसप्रीत बुमराह भारताचा प्रमुख गोलंदाज म्हणून नावारुपाला आला आहे. कसोटी असो टी-२० असो अथवा वन-डे क्रिकेट….बुमराहने आपल्या भेदक माऱ्याच्या जोरावर अनेक मोठ्या फलंदाजांची भंबेरी उडवली आहे. त्यामुळे आगामी विश्वचषकात बुमराह भारताचा हुकमी एक्का आहे. हे लक्षात घेता बीसीसीआयने बुमराहला न्यूझीलंडविरुद्ध मालिकेतून विश्रांती दिली होती. विश्वचषकात प्रत्येक खेळाडू तंदुरूस्त असायला हवा. अशातच आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात मुंबईचे प्रतिनिधित्व करणाऱ्या बुमराहला दुखपत झाली. बुमराह मैदानावर कोसळताच भारतीय चाहते संभ्रमात पडले. त्याची दुखापत गंभीर तर नाही ना ? असा प्रश्न प्रत्येक भारतीयांच्या मनात आला. पण बुमराहची दुखापत गंभीर नसल्याचे स्पष्टीकरण मुंबई इंडियन्सने दिले आहे.

आयपीएलनंतर लगेच विश्वचषकाला सुरूवात होणार आहे. त्यातच बुमराहची दुखापत म्हणजे भारतीय संघासाठी धोक्याची घंटा आहे. बुमराहच्या खांद्यावर भारतीय गोलंदाजीचा भार आहे. मुंबई इंडियन्सच्या व्यवस्थापकाने बुमारहची दुखपात गंभीर नसल्याचे सांगितले आहे. पण आज सोमवारी पुन्हा एकदा दुखपतीची स्थिती पाहिली जाईल. सामन्यानंतर मुंबई इंडियन्सने सांगितले की,”क्षेत्ररक्षण करताना जसप्रीत बुमराहच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली होती. पण, तो त्यातुन सावरत आहे आणि सोमवारीही त्याच्या तंदुरूस्तीची चाचणी केली जाईल. याबाबत पुढील माहिती लवकरच देण्यात येईल.”

दिल्ली कॅपिटल्सच्या डावाचा अखेरचा चेंडू बुमराहने टाकला. पंतने मारलेला फटका अडवण्याच्या प्रयत्नात बुमराहच्या खांद्याला दुखापत झाली. बुमराह मैदानावरच कोसळला. बुमराहची दुखापत किती गंभीर आहे ते त्याच्या चेहऱ्यावरून दिसत होती. खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे वेदनेने विव्हळत होता. त्यानंतर मैदानावर तात्काळ फिजीओ पोहचले आणि प्राथमिक उपचार करत त्याला मैदानाबाहेर नेहले. फलंदाजीवेळी बुमराह मैदानात न आल्यामुळे दुखापत गंभीर असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, मुंबई इंडियन्सने दुखपत गंभीर नसल्याचे सांगितले आहे. मात्र, आज बुमराहच्या दुखपातीची चाचणी होणार आहे. त्यानंतर त्याची दुखापत किती गंभीर ते स्पष्ट होईल.

दरम्यान, घरच्या मैदानावर आपला पहिला सामना खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सला पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाने मुंबईवर 37 धावांनी मात करत बाराव्या हंगामाची सुरुवात विजयाने केली आहे. दिल्लीने दिलेल्या 214 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईचा संघ केवळ 176 धावांपर्यंतच मजल मारु शकला.