लीड्स : गोलंदाजीच्या निराळ्या शैलीमुळे माझ्यावर कायम प्रश्न उपस्थित केले गेले. तंदुरुस्ती राखणे अवघड जाईल, दुखापती माझा पिच्छा पुरवतील असे अनेकदा म्हटले गेले. मात्र, मी स्वत:च्या क्षमतेवर कायम विश्वास राखला. आत्मविश्वास आणि दृढनिश्चिय याच्या जोरावरच मी यशस्वी मजल मारली आहे. मैदानातील कामगिरीतूनच मी टीकाकारांना उत्तर देत असल्याचे भारताचा तारांकित वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा म्हणाला.
विश्वातील सर्वोत्तम गोलंदाज अशी ख्याती असलेल्या बुमराने इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात पाच गडी बाद केले. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत, एखाद्या दुखापतीनंतर तुझी कारकीर्द संपुष्टात आल्याचे लोक म्हणतात याचे वाईट वाटते का असे विचारले असता, ‘‘लोक अनेक वर्षांपासून हे बोलत आहेत. त्यामुळे माझ्यासाठी हे नवे नाही.
मी केवळ आठ महिने खेळू शकेन असे कारकीर्दीच्या सुरुवातीला म्हटले गेले. मग काहींनी १० महिन्यांचे भाकीत केले. मात्र, आता जवळपास १० वर्षांपासून मी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे. तसेच १२-१३ वर्षांपासून मी ‘आयपीएल’चा भाग आहे. आताही प्रत्येक दुखापतीनंतर माझी कारकीर्द संपली असे म्हटले जाते. मी यापुढे खेळणार नाही असे लोक म्हणतात. मात्र, मला त्याने फरक पडत नाही. मी माझे काम करत राहणार,’’ असे बुमरा म्हणाला.
‘‘माझी कारकीर्द संपुष्टात येणार असल्याची चर्चा दर चार महिन्यांनी सुरू होते. लोक काय म्हणतात किंवा काय लिहितात, यावर माझे नियंत्रण नाही. माझे नाव वापरून चर्चा घडवून आणणे बहुधा सोपे जात असावे. मात्र, मी याकडे लक्ष देत नाही. मला शक्य असेल तितका काळ मी खेळेन. मेहनत घेणे माझ्या हातात आहे आणि ते मी घेत राहीन,’’ असे बुमराने सांगितले.
झेल सुटणे खेळाचा भागच
इंग्लंडच्या पहिल्या डावात बुमराने पाच बळी मिळवले. तसेच त्याच्या गोलंदाजीवर स्लिपमध्ये काही झेलही सुटले. मात्र, बुमराने सहकाऱ्यांची पाठराखण केली. ‘‘कोणीही मुद्दाम झेल सोडत नाही. हा खेळाचा भागच आहे. कमी सूर्यप्रकाशात काही वेळा चेंडू नीट दिसत नाही. तसेच थंडी असल्यास चेंडू हाताला जोरात लागतो. त्यामुळे कोणालाही दोष देणे योग्य नाही. मी राग व्यक्त करून क्षेत्ररक्षकांवर आणखी दडपण आणणार नाही. प्रत्येक जण मेहनत घेत आहे, सर्वोत्तम कामगिरीसाठी प्रयत्न करत आहे. काही वेळा चुका घडतात. या अनुभवातून आम्हाला नक्कीच शिकायला मिळेल,’’ असे बुमरा म्हणाला.