वृत्तसंस्था, बेकनहॅम

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील आव्हान टिकविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या भारतीय संघाचा मँचेस्टर येथे होणाऱ्या चौथ्या सामन्यातही तारांकित वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराला खेळविण्याकडे कल आहे. मात्र, अंतिम निर्णय सामन्याच्या पूर्वसंध्येलाच घेतला जाईल, असे भारतीय संघाचा साहाय्यक प्रशिक्षक रायन टेन दोएशहाते म्हणाला.

पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघ सध्या १-२ असा पिछाडीवर असून चौथा सामना २३ जुलैपासून मँचेस्टर येथे खेळवला जाणार आहे. त्यापूर्वी भारतीय संघाने गुरुवारी बेकनहॅम येथे सराव केला. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना दोएशहातेने भारतीय संघाच्या योजनेची माहिती दिली.

‘‘बुमराबाबतचा निर्णय आम्ही मँचेस्टरला पोहोचल्यानंतरच घेऊ. उर्वरित दोनपैकी एकाच सामन्यात बुमरा खेळणार असल्याचे आम्हाला ठाऊक आहे. मात्र, आता मालिकेतील आव्हान टिकविणे महत्त्वाचे असल्याने या कसोटीत बुमराला खेळविण्याकडे आमचा कल आहे. मात्र, आम्हाला विविध गोष्टींबाबत विचार करावा लागेल. सामना किती दिवस चालणार? विजय मिळविण्याच्या दृष्टीने सर्वोत्तम पर्याय काय? तसेच ओव्हल येथे होणाऱ्या अखेरच्या कसोटीत कोणाला खेळविणे अधिक योग्य ठरेल? या सगळ्याचा विचार करूनच आम्हाला निर्णय घ्यावा लागेल,’’ असे दोएशहातेने सांगितले.

पंतबाबत सकारात्मक

तिसऱ्या कसोटीत यष्टिरक्षक ऋषभ पंतच्या बोटाला दुखापत झाली. त्यामुळे त्याला पहिल्या डावातील उत्तरार्ध, तसेच दुसऱ्या डावात यष्टिरक्षण करता आले नाही. त्याने दोन्ही डावांत फलंदाजी केली, पण त्याला चेंडू मारताना अडचण येत होती. मात्र, मँचेस्टर कसोटीपूर्वी तो तंदुरुस्त होणे अपेक्षित असल्याचे दोएशहातेने सांगितले. परंतु तो यष्टिरक्षण करणार की नाही, याचे स्पष्ट उत्तर देणे त्याने टाळले. ‘‘तिसऱ्या कसोटीत फलंदाजी करतानाही पंतला वेदना झाल्या. मात्र, आता विश्रांतीमुळे त्याची दुखापत बरी होत आहे. यष्टिरक्षण हा या प्रक्रियेचा अखेरचा भाग आहे. डावाच्या मध्यातच पुन्हा यष्टिरक्षक बदलावा लागेल अशी स्थिती आम्हाला ओढवून घ्यायची नाही. आम्ही पंतला अधिकाधिक वेळ देण्याचा प्रयत्न करत आहोत. मँचेस्टर येथे होणाऱ्या पहिल्या सराव सत्रात तो सहभागी होईल अशी आम्हाला आशा आहे,’’ असे दोएशहातेने नमूद केले.

दुसऱ्या संधीतही अपयश; करुणला डच्चू निश्चित?

● काही वर्षांपूर्वी कसोटी संघातून बाहेर गेल्यानंतर देशांतर्गत स्पर्धेतही संधी न मिळाल्याने निराश झालेल्या करुण नायरने ‘प्रिय क्रिकेट, मला आणखी एक संधी दे,’ असे ‘ट्वीट’ केले होते. क्रिकेटने करुणला दुसरी संधी दिली, पण त्याचा योग्य वापर करून घेण्यात तो अपयशी ठरला.

● इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांत मिळून एकही अर्धशतक करू न शकलेल्या ३३ वर्षीय करुणला आता चौथ्या सामन्यासाठी भारतीय संघातून डच्चू मिळण्याची दाट शक्यता आहे.

● इंग्लंडविरुद्धच्या सहाही डावांत चांगल्या सुरुवातीचे मोठ्या खेळीत रूपांतर करण्यात करुण चुकला. त्याला अनुक्रमे ०, २०, ३१, २६, ४०, १४ धावाच करता आल्या. त्याने ‘ड्राइव्ह’चे काही नेत्रदीपक फटके मारले, पण खेळपट्टीच्या मध्यावरून अतिरिक्त उसळी घेणाऱ्या चेंडूंविरुद्ध तो वारंवार अडचणीत सापडताना दिसला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

● तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात तो ज्या प्रकारे बाद झाला, त्यामुळे त्याच्यावर बरीच टीका झाली. अशात करुणच्या जागी युवा साई सुदर्शनला संधी देण्याबाबत संघ व्यवस्थापन विचार करू शकेल.