scorecardresearch

IND vs ENG Test: बुमराहने ब्रॉडच्या एकाच षटकात कुटल्या ३५ धावा; रचला विश्वविक्रम, फलंदाजीचा Video पाहून थक्क व्हाल

इंग्लंडमधील बर्मिगहॅम येथे सुरु असणाऱ्या पाचव्या कसोटीमध्ये कर्णधार बुमराहने तुफान फलंदाजी केली

Jasprit Bumrah scores 35 runs in one over of Stuart Broad
ब्रॉडच्या ओव्हरला तुफान फटकेबाजी

Jasprit Bumrah scores 35 runs in one over of Stuart Broad : २००७ साली भारताचा स्फोटक फलंदाज युवराज सिंहने इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडला सहा चेंडूंमध्ये सहा षटकार लगावले होते. एका षटकात ३६ धावा करण्याचा पराक्रम युवराजने केला होता. असाच काहीसा पराक्रम आज इंग्लंडमधील बर्मिगहॅम येथे सुरु असणाऱ्या पाचव्या कसोटीमध्ये पहायला मिळाला. ऋषभ पंत आणि रविंद्र जाडेजाने पहिला दिवस गाजवल्यानंतर दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रामध्ये भारताचा कर्णधार जसप्रीत बुमराहने फलंदाजी करताना केलेली भन्नाट कामगिरी चर्चेचा विषय ठरली. बुमराहची की विक्रमी कामगिरी ठरली. या पूर्वी हा विक्रम ब्रायन लाराच्या नावावर होता. त्याने २००३ साली पिटरसनच्या गोलंदाजीवर एका षटकात २८ धावा कुटलेल्या.

सामन्यातील ८४ आणि दुसऱ्या दिवसातील ११ व्या षटकामध्ये बुमराहने स्टुअर्ट ब्रॉडची जबरदस्त धुलाई केली. एक वाइड आणि एका नो बॉलच्या जोरावर बुमराहने या षटकामध्ये तब्बल ३५ धावा कुटल्या. या षटकामधील शेवटचा चेंडू वगळता प्रत्येक चेंडू बुमराहने सीमेपार धाडला. नेमकं या षटकामध्ये काय घडलं पाहूयात…

– ८४ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर ब्रॉडला बुमराहने चौकार लगावला

– पुढच्या चेंडूवर ब्रॉडने टाकलेल्या चेंडूने अनपेक्षित उसळी घेतली आणि तो फलंदाजाबरोबरच विकेटकीपरच्याही डोक्यावरुन चौकार गेला. उंचीमुळे हा चेंडू वाइड देण्यात आला.

– त्याच्या पुढच्या चेंडूवर ब्रॉडला बुमहारने षटकार लगावला. विशेष म्हणजे हा चेंडू नो बॉल होता. ब्रॉडने चेंडू टाकताना क्रीजबाहेर ओलांडल्याने नो बॉल देण्यात आला. मोठा फटका मारण्याच्या नादात चेंडू बुमराहच्या बॅटला वरच्या भागा लागला आणि फाइन लेगवरुन थेट षटकार गेला.

– हा सुद्धा नो बॉस असल्याने अवघ्या एका चेंडूमध्ये १६ धावा झाल्या.

– ब्रॉडच्या पुढच्या चेंडूवर बुमराहने चौकार लगावला. ब्रॉडने यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा अंदाज चुकला आणि बुमराहने त्याचा फायदा घेत लाँग ऑनला चौकार लगावला.

– षटकातील तिसऱ्या चेंडूवरही बुमराहने चौकार लगावत भारताची धावसंख्या ४०० वर पोहचवली. ब्रॉडने टाकलेल्या चेंडूवर बुमराह पुन्हा मोठा फटका मारला गेला आणि पुन्हा त्याचा अंदाज चुकला. मात्र सुदैवाने बॅटची कडा लागून चेंडू फाइन लेगच्या दिशेने चौकार गेला.

– चौथ्या चेंडूवर बुमराने चौकार लगावला. ब्रॉडने अखूड टप्प्याचा चेंडू टाकला. त्यावर बुमराहने तिरक्या बॅटने फटका मारायचा प्रयत्न केला. हा फटका पूर्णपणे यशस्वी ठरला नाही. तरी त्यामध्ये इतकी ताकद होती की चेंडू सीमारेषेपार गेला.

– पाचव्या चेंडूवर ब्रॉडला बुमराहने खणखणीत षटकार लगावला. या षटकारासहीत एक चेंडू शिल्लक असतानाच षटकात ३४ धावांची लयलूट बुमराहने केली. अखडू टप्प्याचा पायावर टाकलेला चेंडू बुमराहने बॅक फुटवर जाऊन अलगद बॅटवर घेऊन फाइन लेगला षटकार टोलवला. या धावा पाहून ब्रॉडला नक्कीच युवराजच्या सहा चेंडूंमध्ये सहा षटकारांची आठवण झाली असणार.

– षटकातील शेवटचा आणि एकमेव चेंडू जो सीमारेषेपार गेला नाही. या चेंडूवर बुमराहने एक धाव घेत स्वत:कडे स्ट्राइक घेतली.

षटक संपल्यानंतर उपस्थित प्रेक्षकांनी आरडाओरड करुन बुमराहच्या फलंदाजीचं कौतुक केलं. हे कसोटी क्रिकेटमधील सर्वात महागडं षटक ठरलं. बुमराहची ही खेळी पाहून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही ट्विटरवरुन बुमराहचा फोटो पोस्ट करत, “हा बुमराह आहे की युवराज?… २००७ च्या आठवणी ताज्या झाल्या,” असं म्हटलंय.

पुढच्याच षटकामध्ये पाचव्या चेंडूवर भारताचा शेवटचा गडी मोहम्मद शामीला जेम्स अँडरसनने झेलबाद केलं आणि भारताचा पहिला डाव ४१६ धावांवर संपला.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Jasprit bumrah scores 35 runs in one over of stuart broad creates test history scsg

ताज्या बातम्या