भारतीय क्रिकेट बोर्ड म्हणजेच बीसीसीआय सध्या भारताच्या नव्या प्रशिक्षकाच्या शोधात आहे. यादरम्यान २३ मे रोजी दिल्ली कॅपिटल्सचे प्रशिक्षक रिकी पॉंटिंग आणि लखनऊ सुपर जायंट्सचे प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदासाठी संपर्क साधण्यात आल्याची वक्तव्य केली होती, परंतु त्यांनी नकार दिला. आता एका दिवसानंतर, BCCI चे सचिव जय शाह यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने भारताचे मुख्य प्रशिक्षक होण्यासाठी माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंशी संपर्क साधल्याचा दावा फेटाळून लावला आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या टी-२० विश्वचषकानंतर सध्याचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपत आहे.

ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू रिकी पाँटिंग आणि जस्टिन लँगर यांनी भारताच्या प्रशिक्षक पदाची ऑफर नाकारल्याचा दावा केला आहे. दुसरीकडे, चेन्नई सुपर किंग्जचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी राहुल द्रविडच्या जागी निवड करावी अशीही बोर्डाची इच्छा आहे. जर फ्लेमिंग या पदासाठी तयार नसतील तर त्याच्याशी बोलण्याची जबाबदारी एमएस धोनीवर सोपवण्यात आली आहे. अशा अनेक चर्चांना उधाण आले आहे.

हेही वाचा – रिकी पॉंटिंगने भारताचा प्रशिक्षक होण्याची ऑफर नाकारली, स्वत: सांगितलं यामागचं कारण

रिकी पाँटिंग-जस्टिन लँगर खोटं बोलले?

दरम्यान, शाह यांनी एका निवेदनात म्हटले आहे – मी किंवा बीसीसीआयने प्रशिक्षकपदासाठी कोणत्याही माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूशी संपर्क साधला नाही. याबाबत मीडियामध्ये सुरू असलेल्या चर्चा आणि बातम्या पूर्णपणे चुकीच्या आहेत. भारताच्या राष्ट्रीय संघासाठी योग्य प्रशिक्षक शोधणे ही एक सखोल प्रक्रिया आहे. आम्ही अशा व्यक्तीच्या शोधात आहोत ज्याला भारतीय क्रिकेटची सखोल माहिती आहे आणि ती व्यक्ती कौशल्याने नावारूपाला आलेली असावी. भारताचा प्रशिक्षक होण्यासाठी भारताच्या देशांतर्गत क्रिकेटची समज आणि ज्ञान असणंही महत्त्वाचं आहे, जेणेकरून तो भारतीय संघाला अजून चांगल्या स्तरावर नेऊ शकेल.

हेही वाचा – हार्दिक पंड्या – नताशा स्टॅनकोविक विभक्त होणार? इन्स्टाग्रामवर केला मोठा बदल, चर्चांना उधाण

इंडियन प्रीमियर लीगमध्ये पाँटिंग आणि लँगर अनुक्रमे दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्सचे प्रशिक्षक आहेत. आपल्या कुटुंबाला वेळ द्यायचा आहे आणि भारताचा प्रशिक्षक झाल्यानंतर ते थोडे कठीण होईल, असे पाँटिंगने म्हटले होते. तर दुसरीकडे, जस्टिन लँगरने याबाबत केएल राहुलशी बोलल्याचे सांगितले. त्याने मला सल्ला दिला की आयपीएलमधील संघांपेक्षा भारतीय संघात जास्त राजकारण आणि दबाव आहे. राष्ट्रीय संघाचा प्रशिक्षक बनणे सोपे नाही. मी सध्या ही जबाबदारी आणि दबाव पेलण्यासाठी तयार नाही. असे लँगर म्हणाले. आपल्या प्रशिक्षणाखाली लँगरने ऑस्ट्रेलियन संघाला टी-२० विश्वचषक चॅम्पियन बनवले आहे. तर कोलकाता नाईट रायडर्सचा मार्गदर्शक आणि माजी फलंदाज गौतम गंभीरचाही या पदासाठी प्रमुख दावेदार मानला जात आहे.