India vs England 2nd Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचा थरार एजबस्टनमध्ये सुरू आहे. या सामन्यात इंग्लंडचा यष्टिरक्षक फलंदाज जेमी स्मिथने कहर केला आहे. बेन स्टोक्स आणि जो रूट बाद झाल्यानंतर तो फलंदाजीला आला आणि पहिल्याच सत्रात दमदार शतक झळकावलं आहे. यादरम्यान त्याने एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.
सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या जेमी स्मिथने भारतीय गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. ज्यावेळी तो फलंदाजीला आला त्यावेळी इंग्लंडचा डाव फसलेला होता. मात्र, त्याने मागचा पुढचा विचार न करता मिळालेल्या संधीचा फायदा घेतला. भारतीय गोलंदाजांनी त्याच्याविरुद्ध गोलंदाजी करताना शॉर्ट आणि बाऊंसर चेंडूंचा वापर केला. मात्र, जेमी स्मिथने ही संधी समजून मोठे फटके मारले. चौकारांचा पाऊस पाडत त्याने अवघ्या ८० चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं. यासह तो इंग्लंडसाठी तिसरं सर्वात वेगवान शतक झळकावणारा फलंदाज ठरला आहे.
असा रेकॉर्ड करणारा इंग्लंडचा पहिलाच फलंदाज
यासह जेमी स्मिथच्या नावावर कसोटी क्रिकेटमधील आणखी एक मोठा रेकॉर्ड नोंदवला गेला आहे. जो आजवर इंग्लंडच्या कुठल्याही फलंदाजाला करता आला नव्हता. स्मिथ हा इंग्लंडचा पहिला असा फलंदाज ठरला आहे ज्याने पहिल्या डावात फलंदाजीला येऊन लंचच्या आधी शतक झळकावलं आहे. याआधी हा रेकॉर्ड इंग्लंडच्या कुठल्याही फलंदाजाला करता आला नव्हता. १८७७ ला पहिला कसोटी सामना खेळवला गेला होता. तेव्हापासून कुठल्याही फलंदाजाला पहिल्या सत्रात फलंदाजीला येऊन लंच ब्रेकच्या आधी शतक झळकावता आलं नव्हतं. त्यामुळे जेमी स्थिमने केलेली खेळी विक्रमी ठरली आहे.
इंग्लंडच्या २५० धावा पू्र्ण
भारतीय संघाने केलेल्या ५८७ धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंडला हवी तशी सुरूवात करता आली नव्हती. सुरूवातीलाच इंग्लंडला २ मोठे धक्के बसले. बेन डकेट आणि ओली पोप शून्यावर माघारी परतले. जॅक क्रॉली अवघ्या १९ धावा करत माघारी परतला. जो रूट २२ आणि बेन स्टोक्स शून्यावर माघारी परतला. त्यानंतर हॅरी ब्रुक आणि जेमी स्मिथ यांनी मिळून १५० हून अधिक धावांची भागीदारी केली. यासह इंग्लंडने २५० धावांचा पल्ला गाठला आहे.