देशातील महिला क्रिकेटच्या प्रगतीत योगदान दिलेल्या सर्वांसाठी आम्हाला विश्वचषक स्पर्धा जिंकायची आहे. त्यासाठी बाहेरील लोकांची मते आणि त्यांच्या अपेक्षांचे दडपण घेण्यापेक्षा संघात सकारात्मक वातावरण राखण्यावर आम्ही भर देत आहोत, असे भारताची फलंदाज जेमिमा रॉड्रिग्जने सांगितले. यंदा भारताला महिला एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे सह-यजमानपद भूषविण्याची संधी लाभली आहे. भारताने अद्याप एकदाही विश्वचषकाचे जेतेपद पटकावलेले नाही. यंदा ही प्रतीक्षा संपविण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न आहे. या स्पर्धेची भारताने दमदार सुरुवात करताना पहिल्या दोन सामन्यांत अनुक्रमे श्रीलंका आणि पाकिस्तान या संघांना नमविले आहे. आता कामगिरीत सातत्य राखण्याचा भारतीय संघाचा मानस असल्याचे जेमिमाने सांगितले.
‘‘आम्ही एका वेळी केवळ एका सामन्याचा, एका दिवसाचा विचार करत आहोत. संघात सकारात्मक वातावरण राखण्यावर आमचा भर आहे. चाहत्यांना आमच्याकडून खूप अपेक्षा आहेत हे आम्ही जाणतो. मात्र, आम्ही त्याचा विचार करणे टाळत आहोत. आम्हाला विविध आव्हानांना सामोरे जावे लागेल. मात्र, सकारात्मक ऊर्जा राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आमच्या संघातील प्रत्येक जण एकमेकीला पाठिंबा देत आहे. आम्ही एकमेकींचे यशही साजरे करत आहोत. इथूनच आमच्यात खूप छान नाते निर्माण होत आहे,’’ असे जेमिमा म्हणाली.
तसेच भारतातील महिला क्रिकेटच्या प्रगतीबाबत विचारले असता, ‘‘मी जेव्हा भारतीय संघात आले, तेव्हा मिताली दी (मिताली राज) आणि झुलन दी (झुलन गोस्वामी) आमच्या सीनियर होत्या. त्यांच्याकडून आम्हाला खूप शिकायला मिळाले. आता हरमन दी (हरमनप्रीत कौर) आणि स्मृती (मनधाना) ही जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांनी संघाला एकत्र बांधून ठेवले आहे. देशातील महिला क्रिकेटला प्रगतीपथावर आणणाऱ्या मिताली दी, झुलन दी, नीतू मॅम (नीतू डेव्हिड) यांच्यासाठी आम्हाला विश्वचषक जिंकायचा आहे. त्यांच्यामुळेच भारतीय क्रिकेट इतक्या मोठ्या स्तरावर पोहोचले आहे,’’ असे जेमिमाने सांगितले.