Abhishek Sharma On Yuvraj Singh: अभिषेक शर्माने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नंबर १ फलंदाज होण्याचा मान पटकावला आहे. अवघ्या एका वर्षात त्याने आयसीसी टी-२० फलंदाजांच्या रँकिंगमध्ये सर्वोच्च रेटिंग पॉईंट्स मिळवले आहेत. पण हे रात्रीत घडलं असं नाही. यामागे अभिषेक शर्माने वर्षानुवर्षे घेतलेली मेहनत आहे. अभिषेकला घडवण्यात माजी फलंदाज युवराज सिंगचा मोलाचा वाटा आहे. आता अभिषेक शर्माने युवराज सिंगबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

भारतीय १९ वर्षांखालील संघाने २०१८ मध्ये झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाने जेतेपदाचा मान मिळवला. या स्पर्धेत अभिषेक शर्मा आपल्या अष्टपैलू कामगिरीमुळे चर्चेत आला होता. या कामगिरीच्या बळावर त्याची दिल्ली डेअरडेव्हिल्स संघात निवड झाली होती. या संघाकडून खेळताना त्याने आपल्या आयपीएल कारकिर्दीची सुरुवात केली होती. पण या संघाकडून खेळताना त्याला फार यश मिळालं नव्हतं.

अभिषेक शर्माच्या क्रिकेट कारकिर्दीला सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळताना कलाटणी मिळाली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील स्फोटक फलंदाज ट्रॅव्हिस हेडसोबत खेळताना त्याच्या फलंदाजीत आक्रमकता आली. पण अभिषेक शर्माला घडवण्यात युवराज सिंगचा मोलाचा वाटा राहिला आहे. ही जोडी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आता गुरु शिष्याची जोडी म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. दरम्यान युवराजने अभिषेक शर्माला विश्वास पटवून दिला होता की, तो येणाऱ्या २-३ वर्षात भारतीय संघाकडून खेळू शकतो. अभिषेक शर्माने आपल्या क्रिकेट कारकिर्दीतील टर्निंग पाँईंट कोणता,याबाबत देखील खुलासा केला आहे. कोरोना काळात लॉकडाऊन सुरू असताना अभिषेक शर्मा, शुबमन गिल, प्रभसिमरन सिंग आणि अनमोलप्रित सिंग हे पंजाब संघातील खेळाडू युवराज सिंगच्या घरी क्रिकेटचा सराव करायचे. हा त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील टर्निंग पाँईंट ठरला. अडचणीत असताना, त्याला युवराज सिंगचं मोलाचं मार्गदर्शन मिळालं असल्याचंही त्याने मुलाखतीत सांगितलं.

ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्सला दिलेल्या मुलाखतीत अभिषेक शर्मा म्हणाला, “युवराज सिंगने मला सांगितलं होतं की, मी तुला फक्त राज्यासाठी, आयपीएलसाठी किंवा कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी तयार करत नाहीये. तर तू पुढे जाऊन भारतासाठी सामने जिंकून द्यावे यासाठी तयार करत आहे. युवी पाला (युवराज) माझ्यावर पूर्ण विश्वास होता.” अडचणीत असताना, त्याला युवराज सिंगचं मोलाचं मार्गदर्शन मिळालं असल्याचंही त्याने मुलाखतीत सांगितलं.