घरच्या मैदानात प्रेक्षकांकडून निराशा; पेनल्टी शूटआऊटमध्ये पाहुण्यांची बाजी
बाराव्या खेळाडूची भूमिका चोख बजावणाऱ्या केरळा ब्लास्टर्सच्या चाहत्यांनी इंडियन सुपर लीग फुटबॉलच्या अंतिम लढतीत भलतेच दडपण बाळगल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे घरच्या मैदानावर खेळणाऱ्या केरळला प्रोत्साहन देण्याऐवजी हे चाहते नि:शब्दच होते. त्यांचा हा अबोलपणा पाहुण्या अॅटलेटिको डी कोलकाताच्या पथ्यावर पडला आणि त्यांनी आखलेल्या रणनीतीनुसार खेळ करत केरळला १-१ अशा बरोबरीत रोखण्यात यश मिळवले. पेनल्टी शूटआऊटमध्ये अखेरच्या संधीवर जेवेल राजा शेखने निर्णायक गोल करून कोलकाताला ४-३ असा विजय मिळवून दिला. २०१४च्या अंतिम लढतीची पुनरावृत्ती करताना कोलकाताने दुसऱ्यांदा आयएसएलच्या जेतेपदावर नाव कोरले.
कॉर्नर आणि गोल..
उपांत्यपूर्व फेरीत बचावात्मक खेळ करून मुंबई सिटीला पराभव मानण्यास भाग पाडणाऱ्या कोलकाताने अंतिम लढतीत याच रणनीतीचा वापर केला. मजबूत बचावाचा नजराणा पेश करत कोलकाताने यजमानांना निष्फळ केले. नवव्या मिनिटाला मोहम्मद रफीला गोल करण्याची संधी होती, परंतु कोलकाताच्या बचावासमोर तो अपयशी ठरला. १४व्या मिनिटाला इयान ह्य़ुम आणि हेल्डर पोस्टिगा यांच्यात रंगलेला ताळमेळ पाहून यजमानांवरील दडपण वाढले. १७व्या मिनिटाला सॅमीघ डॉटीएने डावीकडून टोलावलेला चेंडू केरळाचा गोलरक्षक ग्रॅहम स्टॅकने अचूक अडवला. पुढील २० मिनिटांच्या खेळात दोन्ही संघांनी गोल करण्याच्या समान संधी गमावल्या. ३५ मिनिटांच्या खेळात स्टेडियमवर पसरलेला शुकशुकाट ३७व्या मिनिटाला जल्लोशात बदलला. मेहताब हुसेनने कॉर्नरवरून टोलावलेला चेंडू रफीने हेडरद्वारे गोलजाळीत धाडला आणि एकच जल्लोश झाला. मात्र हा आनंद काही क्षणांपुरताच मर्यादित राहिला. ४४व्या मिनिटाला डॉटीएने कॉर्नरवरून उडवलेल्या चेंडूवर हेन्रिक सेरेनोने हेडरद्वारे गोल करत सामना १-१ असा बरोबरीत आणला.
प्रशिक्षक जोस यांना तंबी
दुसऱ्या सत्रात कटांळवाणा खेळ झाला. दोन्ही संघांनी अधिक धोका न पत्करता बचावात्मक खेळावरच भर दिला. त्यामुळे ५४,१३६ प्रेक्षकांच्या उपस्थितीतही स्टेडियममध्ये स्मशानशांतता पसरली होती. मध्यंतरानंतर दोन्ही संघांनी बदली खेळाडूंना पाचारण केले, परंतु त्यांचा कलही बचावात्मक होता. पाच मिनिटांच्या भरपाई वेळेत लालरिंडीका राल्टेने कॉर्नरवरून टोलावलेला चेंडू गोलजाळीत धाडायची संधी ह्य़ुमला होती, परंतु केरळाच्या सेड्रिक हेंगबर्टने उत्तम बचाव करून सामना अतिरिक्त ३० मिनिटांत नेला. त्यातही दोन्ही संघ गोल करण्यात अपयशी ठरले. कोलकाताचे प्रशिक्षक जोस मोलिना यांना सामनाधिकारी अलिरेझा फघानी यांनी सीमारेषेवर येऊन दिलेली ताकीद, हा या सत्रातील रोमांचक क्षण म्हणावा लागेल.
केरळा ब्लास्टर्सला दंड
गैरवर्तवणूक आणि प्रेक्षकांनी केलेल्या तोडफोडप्रकरणी अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या शिस्तपालन समितीने रविवारी केरळा ब्लास्टर्स संघाला सहा लाखांचा दंड सुनावला. ४ डिसेंबरला येथे नॉर्थ ईस्ट युनायटेडविरुद्धच्या लढतीत केरळच्या पाच खेळाडूंनी गैरवर्तणूक केली आणि त्यासाठी संघाला दोन लाखांचा आणि प्रेक्षकांनी स्टेडियमच्या साहित्याची नासधूस केल्यामुळे त्यांना ४ लाख दंड भरावा लागणार आहे.