Kuldeep Yadav Clean Bowled Roston Chase Video: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटीत भारताने आपली पकड अधिक घट्ट केली आहे. वेस्ट इंडिजचा निम्मा संघ दुसऱ्या डावातही पहिल्याच सत्रात माघारी परतला आहे. भारताच्या फिरकीपटूंनी विंडिंज संघाच्या फलंदाजांना झटपट माघारी धाडलं आहे. दरम्यान संघ संकटात असताना कर्णधार चेस फलंदाजीला आला, पण कुलदीपने येताच त्याला माघारी धाडलं.
भारताने पहिल्या डावात वेस्ट इंडिजला १६२ धावांवर सर्वबाद केलं. यानंतर भारतीय फलंदाजांनी शानदार फटकेबाजी करत वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना नमवलं. केएल राहुल, रवींद्र जडेजा व ध्रुव जुरेलच्या शतकाच्या बळावर ४४५ धावा केल्या. यासह टीम इंडियाने २८६ धावांची आघाडी घेत तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होण्याआधीच डाव घोषित केला. वेस्ट इंडिजने सावध सुरूवात केली, पण संघाने ५० धावांच्या आत ५ विकेट्स गमावल्या.
एका टोकाकडून जडेजाने दोन कमालीचे विकेट्स घेतल्या. यानंतर कुलदीप यादवने त्याला चांगली साथ देत स्पेलमधील दुसऱ्याच षटकात मोठी विकेट घेतली. वेस्ट इंडिजसाठी कर्णधाराची विकेट गमावणं मोठा धक्का होता.
कुलदीपच्या गुड लेंग्थ चेंडूवर कसा क्लीन बोल्ड झाला रोस्टन चेस?
कुलदीपने चेसला सुरूवातीचे दोन्ही चेंडूवर एकही धाव घेण्याची संधी दिली नाही. तिसरा चेंडू कुलदीपने गुड लेंग्थवर टाकला आणि चेस खेळायला चुकताच ऑफ स्टंपवर जाऊन आदळला. यासह ऑफ स्टंप हवेत गरकन उडाला आणि मागे जाऊन पडला. त्रिफळाचीत झालेलं कळताच चेस वळून विकेटकडे एकटक पाहतच राहिला. फक्त १ धाव करत चेस बाद झाला. तर कुलदीपने हवेत उडी घेत विकेटचं सेलिब्रेशन केलं.
वेस्ट इंडिजचा निम्मा संघ पहिल्याच सत्रात माघारी परतला. भारताच्या फिरकीपटूंनी कमालीची गोलंदाजी करत ४ विकेट्स घेतल्या. जडेजाने ३ तर कुलदीपने एक विकेट घेतली. याशिवाय सिराजने पहिली विकेट घेत संघाला ब्रेकथ्रू मिळवून दिला.