पीटीआय, गुवाहाटी

आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदक आणि जागतिक क्रमवारीत पहिल्या पाचमध्ये स्थान मिळवण्याचे उद्दिष्ट भारताचा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन बाळगून असला, तरी त्यासाठी प्रथम जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतून लय मिळवणे महत्त्वाचे असल्याचेही लक्ष्यने सांगितले.यंदाच्या हंगामात कामगिरीत चढ उतार राहिल्यानंतर सेनने जुलै महिन्यात कॅनडा येथील स्पर्धेत विजेतेपद मिळवून अजूनही आपण सर्वोच्च खेळ करू शकतो हे दाखवून दिले होते. यंदाच्या हंगामात हे विजेतेपद लक्ष्यसाठी कलाटणी देणारे ठरले. या स्पर्धेनंतर लक्ष्यने अमेरिका आणि जपान येथील स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. वयाच्या २१व्या वर्षी जागतिक स्पर्धेत पहिले विजेतेपद पटकावल्यानंतर आता पुन्हा एकदा जागतिक स्पर्धेत आपले कौशल्य दाखविण्यासाठी लक्ष्य सज्ज झाला आहे. डेन्मार्क येथे २१ ऑगस्टपासून जागतिक स्पर्धेला सुरुवात होत आहे.

भारतीय बॅडमिंटन संघटनेच्या राष्ट्रीय सर्वोच्च कामगिरी केंद्राच्या उद्घाटनाप्रसंगी बोलताना अलीकडच्या स्पर्धेतील कामगिरी एका आठवडय़ाने सुरू होणाऱ्या जागतिक स्पर्धेसाठी आत्मविश्वास उंचावणारी ठरेल असे सांगितले. गेल्या काही स्पर्धेतून खेळात सातत्य राहिले आहे. लय मिळत आहे. पण, अजूनही काही गोष्टी शिकायच्या असून, त्यानुसार खेळात सुधारणा करणे आवश्यक असल्याचेही लक्ष्यने या वेळी मान्य केले.

‘‘जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत मी खेळण्यास उत्सुक आहे. या स्पर्धेत लय मिळवून मला पाठोपाठ होणाऱ्या आशियाई स्पर्धेत माझे पहिले पदक मिळवायचे आहे. युवा ऑलिम्पिक आणि राष्ट्रकुल स्पर्धेनंतर आता बहु-क्रीडा स्पर्धेचा आणखी एक अनुभव या स्पर्धेच्या निमित्ताने मिळणार आहे. चार वर्षांतून एकदाच अशा स्पर्धा होतात. त्यामुळे या स्पर्धेत चांगली कामगिरी करणे खूप महत्त्वाचे आहे,’’ असे लक्ष्य म्हणाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यंदाच्या हंगामातील कामगिरीत झालेल्या चढ उतारामुळे लक्ष्यचे जागतिक मानांकन सहा वरून २५ इतके घसरले. मात्र, स्वत:ला सावरत लक्ष्यने ११व्या क्रमांकापर्यंत आपले मानांकन सुधारले आहे. कामगिरीत सातत्य राखून मोठय़ा स्पर्धा जिंकण्यासाठी मी आता प्रयत्नशील राहीन असे लक्ष्यने सांगितले.