वृत्तसंस्था, डब्लिन

यंदाच्या हंगामात सर्व स्पर्धांत मिळून तब्बल ५१ सामने अपराजित राहिलेल्या बायर लेव्हरकूसेन संघाला पराभवाचा धक्का देत अटलांटाने ‘युएफा’ युरोपा लीग फुटबॉलचे जेतेपद पटकावले. युरोपा लीग जिंकणारा अटलांटा हा पहिलाच इटालियन संघ ठरला. आक्रमकपटू अॅडेमोला लुकमनने नोंदवलेल्या हॅट्ट्रिकच्या जोरावर अटलांटाने अंतिम सामन्यात ३-० अशी बाजी मारली.

स्पेनचा माजी मध्यरक्षक झाबी अलोन्सोच्या मार्गदर्शनाखाली लेव्हरकूसेनच्या संघाने यंदाच्या हंगामात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यांनी एकही सामना न गमावता जर्मनीतील बुंडसलिगा स्पर्धेचे जेतेपद पटकावले. तसेच सर्व स्पर्धांत मिळून संपूर्ण हंगाम अपराजित राहण्यापासून ते केवळ दोन सामने दूर होते. युरोपा लीगच्या अंतिम लढतीत साहजिकच लेव्हरकूसेनचे पारडे जड मानले जात होते. मात्र, अटलांटाचे ६६ वर्षीय प्रशिक्षक जियान पिएरो गॅस्पेरिनी यांच्या अचूक योजनांचा सामना करण्यात लेव्हरकूसेनचे खेळाडू कमी पडले. आता लेव्हरकूसेनचा जर्मन चषक जिंकून हंगामाची यशस्वी सांगता करण्याचा प्रयत्न असेल.

हेही वाचा >>>VIDEO : मॅक्सवेलने हात आपटला, तर विराट फोन घेऊन…; RCB च्या ड्रेसिंग रुममध्ये पराभवानंतर घडलं तरी काय?

अटलांटाच्या संघाला यापूर्वी युरोपीय स्पर्धांमध्ये फारसे यश मिळाले नव्हते. हा संघ तब्बल ६१ वर्षे कोणतीही मोठी स्पर्धा जिंकू शकला नव्हता. मात्र, गॅस्पेरिनी यांच्या मार्गदर्शनाखालील अटलांटा संघाची जेतेपदाची प्रतीक्षा संपली आहे.

अटलांटाच्या संघाने सुरुवातीपासूनच अंतिम लढतीवर पकड मिळवली. लंडनमध्ये जन्मलेल्या, पण आंतरराष्ट्रीय स्तरावर नायजेरियाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लुकमनने १२व्या मिनिटालाच अटलांटाला गोलचे खाते उघडून दिले. त्यानंतर २६व्या मिनिटाला लुकमननेच अटलांटाची आघाडी दुप्पट केली. अटलांटाने लेव्हरकूसेनच्या बचाव फळीवर सातत्याने दडपण राखले. उत्तरार्धात ७५व्या मिनिटाला लुकमनने आपली हॅट्ट्रिकही पूर्ण केली. त्यानंतर लेव्हरकूसेनला पुनरागमन शक्य झाले नाही आणि संपूर्ण हंगाम अपराजित राहण्याचे त्यांचे स्वप्नही भंग पावले.