Hearbreaking Scenes In RCB Dressing Room After IPL Exit : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले. एलिमिनेटरमध्ये राजस्थान रॉयल्सने त्यांना पराभूत करून क्वालिफायर-२ मध्ये प्रवेश केला. आयपीएल २०२४ मधील खराब सुरुवातीनंतर कोहली व टीमने जोरदार कमबॅक केले आणि ‘प्लेऑफ’चे तिकीट मिळवले; परंतु यंदाही ‘प्लेऑफ’मध्ये पोहोचल्यावर संघाला पराभवामुळे बाहेर पडावे लागले. पण सलग सहा सामने जिंकून ‘प्लेऑफ’मध्ये पोहोचल्यानंतर झालेला पराभव स्वीकारणे आता आरसीबीच्या खेळूंनाही अवघड जात आहे. या पराभवाने आरसीबीचे खेळाडू आणि लाखो चाहते दु:खी झाले आहेत. त्यात कर्णधार फाफ डू प्लेसिस, विराट कोहली, दिनेश कार्तिक, ग्लेन मॅक्सवेलसह इतर खेळाडूंच्याही चेहऱ्यावर ती निराशा स्पष्ट दिसत होती. अशाच पराभवानंतर रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरूने एक्सवर खेळाडूंचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे; ज्यामध्ये संघाचे सर्व खेळाडू निराश आणि अस्वस्थ दिसत आहेत.

व्हिडीओची सुरुवात ग्लेन मॅक्सवेलच्या एंट्रीने होते. पराभवानंतर चिडलेला मॅक्सवेल दरवाजावर जोरात हात मारत डेसिंग रूममध्ये शिरताना दिसतोय. तर, विराट कोहली मोबाईलवर काहीतरी करण्यात मग्न आहे. पुढे सिराजने दिनेश कार्तिकला उचून घेतल्याचे दिसतेय. त्यासह संघाचा कर्णधार फाफ डू प्लेसिस इतर खेळाडूंना धीर देत, त्यांचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. इतर खेळाडू उदास चेहऱ्याने बसलेले दिसत आहेत.

ड्रेसिंग रूमचा व्हिडीओ शेअर करीत आरसीबीने लिहिले, “दुर्दैवाने आयपीएल २०२४ मधील आमचा संस्मरणीय प्रवास संपला आहे. विराट कोहली, फाफ डू प्लेसिस व दिनेश कार्तिक यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आणि चाहत्यांचे त्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार मानले. या व्हिडीओमध्ये शेवटी कोहली चाहत्यांच्या पाठिंब्याबद्दल त्यांचे आभार मानताना; तर ग्लेन मॅक्सवेल त्याच्या कामगिरीवर नाराज होताना दिसला. फाफ डू प्लेसिस, विराट कोहली व दिनेश कार्तिक यांनी यंदाच्या आयपीएलबद्दलच्या आपल्या अनुभवासह भावना व्यक्त केल्या आहेत.

फाफ डु प्लेसिस नेमके काय म्हणाला?

आयपीएल २०२४ च्या पहिल्या टप्प्यात आम्ही सहा सामने गमावले. चाहत्यांना आमच्याकडून खूप अपेक्षा होत्या. आम्ही विशेष कामगिरी करण्याचे ठरविले आणि आम्ही त्यासाठी प्रयत्न करीत राहिलो. पण, सामन्यादरम्यान ‘ड्यु’मुळे परिणाम झाला आणि १५ धावा कमी पडल्या. आम्ही खालच्या स्थानी होतो; पण प्रत्येक स्टेडियमवर चाहते पाठिंबा देत होते. आणि आम्हाला सूर गवसल्यानंतर आम्ही चांगली कामगिरी करून दाखवली. परंतु, ट्रॉफीपर्यंत पोहोचण्यासाठी दोन पावले कमी पडली, अशी प्रतिक्रिया फाफ डु प्लेसिसने व्यक्त केली आहे.

अंबाती रायडूने विराट कोहलीच्या RCB ला सुनावले, म्हणाला “आक्रमक सेलिब्रेशन, CSK ला हरवून तुम्ही IPL…”

विराट कोहली नेमके काय म्हणाला?

कोहली म्हणाला, “सीजनचा पहिला हाफ आमच्यासाठी खूपच खराब होता. क्रिकेटर म्हणून ज्याप्रमाणे खेळलं पाहिजे होतं तसं खेळता येत नव्हतं. पण, त्यानंतर आम्ही आमच्या स्वाभिमानासाठी खेळू लागलो; ज्याने आमचा आत्मविश्वास परत आला. पुढे आमच्या मनाप्रमाणे घडत गेलं. आम्ही सलग सहा सामने जिंकले आणि ‘प्लेऑफ’मध्ये प्रवेश केला. ‘प्लेऑफ’मध्ये पात्र ठरणे हा खूप खास क्षण होता. या संघातील सर्व खेळाडूंनी खूप मेहनत घेतली. आम्हाला जसं खेळायचं होतं तसं आम्ही खेळलो.”

चाहत्यांचे मानले आभार

चाहत्यांबाबत कोहली म्हणाला, “प्रत्येक सीजनमध्ये आम्हाला चाहत्यांकडून खूप प्रेम आणि पाठिंबा मिळतो. यंदाचा सीजनही तसाच राहिला. त्यात वेगळं काहीच नव्हतं. आम्हाला चाहत्यांचं खूप प्रेम मिळत आहे. त्याबद्दल आम्ही खूप आभारी आहोत. केवळ बेंगळुरूमध्येच नाही, तर संपूर्ण देशभरात आम्ही जिथे जिथे खेळलो, तिथे तिथे आम्हाला तितकाच मोठा पाठिंबा मिळाला. एवढ्या मोठ्या प्रमाणात साथ दिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार.”

दिनेश कार्तिकनेही सांगितले, “सलग सहा सामने जिंकल्यानंतर आम्हाला वाटले की, कदाचित हा आमचा सीजन आहे; पण खेळात काहीही होऊ शकते. फलंदाज, क्षेत्ररक्षक आणि गोलंदाजांनी शेवटपर्यंत झुंज दिली. आरसीबीसाठी हा सीजन खूप खास होता.”