मुंबई: भारताला विश्वचषक जिंकून देणाऱ्या महिला क्रिकेट संघाची कामगिरी देशातील अनेक मुलींसाठी प्रेरणादायी ठरणार आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी काढले.
महिला विश्वचषक स्पर्धा जिंकणाऱ्या भारतीय संघातील राज्यातील खेळाडूंचा सरकारच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मनधाना, जेमिमा रॉड्रिग्ज, राधा यादव यांना प्रत्येकी २ कोटी २५ लाख, तर प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांना २२ लाख ५० हजार आणि सर्व सहकारी यांना प्रत्येकी ११ लाख रुपये व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडा व युवक कल्याण मंत्री अॅड. माणिकराव कोकाटे, सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशीष शेलार, प्रधान सचिव संजय खंदारे आदी उपस्थित होते. विश्वचषकात भारतीय महिला संघाने पहिल्यांदाच विजेतेपद पटकावून इतिहास रचला आहे. याचा संपूर्ण भारतीयांना अभिमान असल्याचे फडणवीस म्हणाले. सुरुवातीच्या काही पराभवांनंतर संघाने केलेले पुनरागमन उल्लेखनीय आहे. प्रत्येक खेळाडूने कुठल्या ना कुठल्या सामन्यात निर्णायक भूमिका बजावली. या संघातील एकजूट आणि संघभावना महत्त्वाची असून यामुळे विजय मिळविणे शक्य झाल्याचे सांगत फडणवीस यांनी संघाचे अभिनंदन केले.
