ठाणे संघाने महिला व पुरुषांच्या सांघिक विभागात विजेतेपद पटकावित राज्य टेबल टेनिस स्पर्धेत दुहेरी मुकुट मिळविला. दोन्ही अंतिम फेरीत त्यांनी मुंबई उपनगर संघाला हरविले.
शिवछत्रपती क्रीडानगरीत सुरू असलेल्या या स्पर्धेत ठाणे संघाने महिलांच्या अंतिम सामन्यात मुंबई उपनगर संघावर ३-० अशी मात केली. त्या वेळी एकेरीच्या पहिल्या लढतीत माधुरिका पाटकर हिने चार्वी कावळे हिला ११-९, १०-१२, ११-३, ११-९ असे हरविले. पाठोपाठ तिची सहकारी पूजा सहस्रबुद्धे हिने दिव्या देशपांडे हिचा ८-११, ११-९, ८-११, १३-११, ११-४ असा पराभव करीत ठाणे संघास २-० अशी आघाडी मिळवून दिली. वेदिका गर्ग हिने मुंबईच्या मृण्मयी म्हात्रे हिच्यावर १०-१२, ११-६, ११-७, ११-७ अशी मात करीत ठाणे संघास ३-० असा विजय मिळवून दिला.
ठाणे संघाने पुरुषांच्या अंतिम लढतीत मुंबई उपनगर संघावर ३-१ अशी मात केली. त्याचे श्रेय एकेरीचे दोन सामने जिंकणाऱ्या सानिश आंबेकर याला द्यावे लागेल. त्याने रवींद्र कोटियन याला ८-११, ११-३, १३-१५, ११-६, ११-७ असे पराभूत केले तर नोएल पिंटो याच्यावर त्याने १४-१२, ७-११, ३-११, १३-११, १३-११ असा रोमहर्षक विजय मिळविला. ठाण्याच्या चैतन्य उदारे याने निशांत कुलकर्णी याचा १२-१०, ११-६, ११-६ असा पराभव केला. मुंबईकडून पिंटो याने सिद्धेश पांडे याच्यावर ११-८, ८-११, ६-११, ११-८, ११-८ अशी मात करीत एकमेव विजय नोंदविला.
या स्पर्धेतील पाच गटांत मुंबई उपनगर संघाने विजेतेपद मिळविले तर तीन गटांत एअर इंडियास विजेतेपद मिळाले. सांघिक लढतींचा पारितोषिक वितरण समारंभ केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते झाला. राज्याचे सामाजिक न्याय व आदिवासी विकासमंत्री दिलीप कांबळे, राज्य टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष राजीव बोडस, कार्याध्यक्ष शिवाजी सरोदे हे या वेळी उपस्थित होते.