मुंबई : मुंबई क्रिकेट संघटनेने (एमसीए) पदाधिकारी, कार्यकारी परिषद सदस्य आणि ट्वेन्टी-२० मुंबई लीगच्या कार्यकारी परिषदेसाठीची निवडणूक १२ नोव्हेंबरला होणार असल्याचे गुरुवारी जाहीर केले.गेल्या वर्षी अमोल काळे यांच्या निधनानंतर ‘एमसीए’चे अध्यक्षपद रिक्त झाले होते. या पदासाठी नंतर निवडणूक घेण्यात आली होती. यामध्ये अजिंक्य नाईक विजयी ठरले होते. त्यांनी या पदासाठी झालेल्या निवडणुकीत संजय नाईक यांना नमविले होते.
नाईक यांची अध्यक्षपदी निवड झाल्याने रिक्त झालेल्या सचिवपदासाठी पुन्हा निवडणूक घेण्यात आली. यामध्ये अभय हडप निवडून आले. हडप यांनी सचिवपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर रिक्त झालेल्या कार्यकारी परिषदेच्या जागेसाठी पुन्हा निवडणूक झाली होती. यामध्ये सुरेंद्र हरमलकर यांनी दीपन मिस्त्री यांना नमविले होते. आता ‘एमसीए’ची त्रैवार्षिक निवडणूक नोव्हेंबरमध्ये घेतली जाईल.
‘‘कार्यकारी परिषदेने महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव आणि माजी राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांची निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे,’’ असे ‘एमसीए’ने निवेदनात म्हटले आहे.