दिलीप वेंगसरकर
मी सचिनचे नाव खूप ऐकले होते, पण आमची कधी भेट झाली नव्हती. तो आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत खोऱ्याने धावा करत होता. १९८८ साली आमचे (भारतीय संघाचे) सराब शिबीर सुरू असताना वासू परांजपे सचिनला तेथे घेऊन आले. त्यांनी सचिनचे खूप कौतुक केले आणि त्याची फलंदाजी पाहण्याचा मला आग्रह केला. त्या वेळी मी भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवत होतो आणि माझा शंभरावा कसोटी सामना खेळणार होतो. मी नेट्समध्ये कपिल देव, चेतन शर्मा, अर्शद अय्युब आणि मिणदर सिंग यांना सचिनला गोलंदाजी करण्यास सांगितले. सचिनने त्याच्या वयोमानानुसार खूपच चांगली फलंदाजी केली. त्यापेक्षाही त्याची मानसिक प्रगल्भता पाहून मी प्रभावित झालो.
भारतीय संघाचे सराव शिबीर सुरू होते, त्याच वेळी मुंबई संघाची निवड होणार होती. सचिनला मुंबईच्या संघात राखीव खेळाडू म्हणून स्थान मिळाले. मात्र, त्यानंतर भारतीय संघ वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर गेला आणि या संघात माझ्यासह मुंबईचे बरेच खेळाडू होते. त्यामुळे सचिनला मुंबईकडून खेळण्याची संधी मिळाली. त्याने रणजी पदार्पणात शतकी खेळी करत त्याच्यातील गुणवत्ता सिद्ध केली. त्यानंतर त्याने दुलीप करंडकातही शतक झळकावल्याने त्याला भारतीय संघाची दारे खुली झाली. पुढील वर्षी (१९८९) पाकिस्तानच्या दौऱ्यासाठी त्याची भारतीय संघात निवड झाली. भारताकडून खेळताना त्याने काय करिश्मा केला, हे सर्वाना ठाऊक आहेच.
मी आणि सचिनने मिळून मुंबईसाठी काही महत्त्वाच्या भागीदाऱ्या रचल्या. अर्शद अय्युब आणि वेंकटपती राजू यांचा समावेश असलेल्या हैदराबादविरुद्ध आम्ही शतकी भागीदारी केली होती. त्या वेळी जेमतेम १५-१६ वर्षांचा असणाऱ्या सचिनने फिरकीला अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर खूप सुंदर फलंदाजी केली होती. त्यानंतर १९९१च्या रणजी करंडक स्पर्धेचा अंतिम सामनाही खूप गाजला. या सामन्यात हरियाणाकडून मुंबईला केवळ दोन धावांनी पराभव पत्करावा लागला. मात्र, वानखेडेवर झालेल्या या सामन्यात आव्हानाचा पाठलाग करताना १८ वर्षीय सचिनने अप्रतिम फलंदाजी केली. त्या वेळी त्याला कसोटी क्रिकेटचा अनुभव होता आणि हे त्याच्या खेळात दिसत होते.
हरियाणाने आम्हाला (मुंबईला) विजयासाठी ३५५ धावांचे आव्हान दिले होते आणि केवळ अडीच सत्रांचा खेळ शिल्लक होता. त्यातच आमची ३ बाद ३४ अशी स्थिती झाली. त्यानंतर कपिल देव आणि चेतन शर्मा यांसारख्या गोलंदाजांवर सचिनने हल्ला चढवला. त्याने ७५ चेंडूंतच ९६ धावा केल्या. तसेच आमच्यात १३४ धावांची भागीदारी झाली. त्यामुळेच आम्हाला हरियाणाच्या धावसंख्येच्या इतक्या जवळ पोहोचता आले. अखेर आमचा डाव ३५२ धावांवर संपुष्टात आल्याने आम्हाला दोन धावांनी पराभव पत्करावा लागला आणि हरियाणाने पहिल्यांदा रणजी करंडक पटकावला.
सचिनची ही खेळी, तसेच १९९२च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पर्थ कसोटीत त्याने केलेले शतक माझ्या कायम लक्षात राहील. पर्थच्या खेळपट्टीला मोठय़ा भेगा पडल्या होता. तसेच चेंडू कधी खाली राहत होता, तर कधी अधिक उसळी घेत होता. या परिस्थितीत सचिनचे वेगळेपण सिद्ध झाले होते. सचिनचे फलंदाजीचे कौशल्य आणि गुणवत्ता अलौकिक होतीच, पण मानसिक प्रगल्भता हीच त्याची खरी ताकद होती. त्याने संघातील वयाने मोठय़ा असलेल्या सहकाऱ्यांशीही खूप छान जुळवून घेतले होते.
सचिनने अविश्वसनीय यश मिळवले, नाव कमावले, जगभर ओळख कमावली. मात्र, त्याचे पाय अजूनही जमिनीवर आहेत. त्याने कायम क्रिकेटवर लक्ष केंद्रित केले. तो कधी वादात सापडला नाही. कामगिरीत सातत्य राखले. त्यामुळे तो युवकांसाठी एक आदर्श क्रिकेटपटू आहे.
(लेखक भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आहेत.)
(शब्दांकन : अन्वय सावंत)
