Mohammad Siraj on Jasprit Bumrah Injury: जसप्रीत बुमराहची दुखापत म्हटलं की भारतीय क्रिकेट चाहत्यांना धडकी भरते, त्याच्या याच पाठीच्या दुखापतीमुळे इंग्लंड दौऱ्यावर बुमराहला विश्रांती देण्यात आली होती. यावरून बुमराहला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात होतं. पण मोहम्मद सिराजने आता बुमराहची ही दुखापत किती गंभीर होती आणि त्याला विश्रांती दिली नसती त्याचा काय वाईट परिणाम झाला असता, याची माहिती दिली.

जसप्रीत बुमराह इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत फक्त तीन सामने खेळला. बुमराहच्या वर्कलोड मॅनेजमेंटबद्दल बरीच चर्चा झाली, विशेषतः जेव्हा ओव्हलमधील शेवटच्या कसोटीपूर्वी भारत १-२ असा पिछाडीवर असताना बुमराहला संघातून रिलीज करण्यात आलं होतं. यानंतर बुमराहला प्रचंड ट्रोल करण्यात आलं आणि म्हटलं की कोणता सामना खेळणार आणि कोणता नाही, हे निवडण्याची मुभा त्याला दिली नाही पाहिजे.

ओव्हल कसोटीचा हिरो ठरलेल्या मोहम्मद सिराजने द इंडियन एक्सप्रेसच्या आयडिया एक्सचेंजमध्ये बुमराह अखेरची कसोटी का नाही खेळला, याबाबत विचारण्यात आलं. बुमराहच्या पाठीच्या शस्त्रक्रियेचा हवाला देत सिराज म्हणाला की ओव्हलमध्ये खेळल्याने त्याची कारकीर्द संपुष्टात येऊ शकली असती.

बुमराह ओव्हल कसोटी खेळला असता तर संपलं असतं करियर

सिराज बुमराहच्या दुखापतीबाबत सांगताना म्हणाला, “बुमराहला बाहेरचे लोक काय म्हणतात, त्यांचं काय मत आहे याची मतांची पर्वा नाही. त्याच्या पाठीला गंभीर दुखापत झाली होती आणि त्याच्यावर मोठी शस्त्रक्रियाही झाली होती. जर त्याने त्या सामन्यात गोलंदाजी केली असती आणि दुखापत वाढली असती, तर तो पुन्हा कधी गोलंदाजी करू शकला असता का हे कोणीच सांगू शकत नाही, इतकी गंभीर ती दुखापत आहे.”

“बुमराहची गोलंदाजी अॅक्शन खूप वेगळी आणि अवघड आहे. तो भारतीय संघासाठी खूप महत्त्वाचा खेळाडू आहे आणि तो आशिया चषकापासून ते पुढच्या वर्षीच्या विश्वचषकापर्यंत उपलब्ध असणदेखील तितकंच महत्त्वाचं आहे. भारतीय चाहत्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की तो संघाचा कणा आहे आणि शक्य असेल तेव्हा तो खेळेल तुम्ही निश्चिंत राहा. जसप्रीतने एकदम योग्य निर्णय घेतला होता,” असं सिराज पुढे म्हणाला.

२०२५ च्या सुरुवातीला ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे काही काळ खेळू शकला नाही. त्यामुळे तो चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळू शकला नाही. आयपीएल २०२५ च्या सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकल्यानंतर, मुंबई इंडियन्ससाठी नंतरचे १२ सामने बुमराह खेळताना दिसला. त्यानंतर इंग्लंड दौऱ्यावर तो फक्त तीन कसोटी सामने खेळला. त्यानंतर आशिया चषकात तो सर्व महत्त्वाच्या सामन्यांमध्ये खेळताना दिसला. यानंतर आता वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी तो भारतीय संघाचा भाग आहे.