Asia Cup Trophy Controversy Update: भारतीय संघाने आशिया चषक २०२५ च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव करत स्पर्धेचे जेतेपद आपल्या नावे केले. पण जेतेपद पटकावल्यानंतर टीम इंडियाने मोहसीन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी घेण्यास नकार दिल्याने अद्याप विजेत्या भारतीय संघाला ट्रॉफी देण्यात आलेली नाही. मोहसीन नक्वींना स्वत:च्या हस्ते भारतीय संघाला ट्रॉफी देण्याचा हट्ट करत होते. पण हा हट्ट पूर्ण न झाल्याने ते ट्रॉफी घेऊन निघून गेले. बीसीसीआय सर्व प्रकरण शांतपणे हाताळत असतानाही नक्वी मात्र याला उलट उत्तर देताना दिसत आहेत.
आशिया कप ट्रॉफीवरून बीसीसीआय आणि एसीसी प्रमुख मोहसीन नक्वी यांच्यातील वाद सुरूच आहे. बीसीसीआयने अलिकडेच एसीसीला ईमेल पाठवून आशिया चषक ट्रॉफी भारताला परत करण्यास सांगितले होते. आता, त्या ईमेलला उत्तर देताना, मोहसीन नक्वी यांनी टीम इंडियाला ट्रॉफी देण्यास नकार दिला आहे.
श्रीलंका आणि अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डांकडून बीसीसीआयला पाठिंबा मिळत असला तरी, आशियाई क्रिकेट परिषदेचे पाकिस्तानी प्रमुख मोहसीन नक्वी हे मान्य करण्यास तयार नाहीत. विजेत्या संघाला अद्याप ट्रॉफी देण्यात आलेली नाही. वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयचा प्रतिनिधी दुबईला एसीसी मुख्यालयातून ट्रॉफी घेण्यासाठी येऊ शकतो, परंतु भारतीय बोर्डाने नकार दिला आहे. बीसीसीआय पुढील महिन्यात होणाऱ्या आयसीसीच्या बैठकीत हा मुद्दा पुन्हा उपस्थित करेल.
“तुमच्या कॅप्टन-खेळाडूंसह या आणि माझ्याकडून ट्रॉफी घेऊन जा”- मोहसीन नक्वी
एसीसीच्या सूत्रांनी सांगितले की, बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया, एसीसीमधील बीसीसीआयचे प्रतिनिधी राजीव शुक्ला आणि श्रीलंका आणि अफगाणिस्तानसह इतर सदस्य मंडळांच्या प्रतिनिधींनी गेल्या आठवड्यात एसीसीला पत्र लिहून भारताला ट्रॉफी देण्याची विनंती केली.
दरम्यान मोहसीन नक्वींनी भारतीय संघाला ट्रॉफी परत करण्यासाठी दुबईत एक कार्यक्रम आयोजित करणार असल्याचा प्रस्ताव मांडला आहे. हा कार्यक्रम १० एसीसी आणि बीसीसीआय यांच्यादरम्यान पार पाडले. मोहसीन नक्वी कराचीमध्ये माध्यमांशी बोलताना म्हणाले, “बीसीसीआयबरोबर या संबंधित विषयावर बऱ्याचवेळा पत्रव्यवहार झाला आणि एसीसीने त्यांना सुचवलं आहे की १० नोव्हेंबरला भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव, संपूर्ण संघ आणि बीसीसीआयचे राजीव शुक्ला यांच्यासाठी एक कार्यक्रम आयोजित करतो. जिथे ट्रॉफी भारताला परत दिली जाईल.”
एसीसीने बीसीसीआयला सांगितलं आहे की, “हा कार्यक्रम १० नोव्हेंबरला दुबईत ठेवला जाईल. तुमचा कर्णधार व संघासह या आणि माझ्याकडून ट्रॉफी घेऊन जा”, असं नक्वी पुढे म्हणाले.
भारतीय संघाने मात्र मोहसीन नक्वींच्या हातून ट्रॉफी घेण्यास साफ नकार दिला आहे. पण नक्वी मात्र मीच ट्रॉफी देणार यावर अडून राहिले आहेत. बीसीसीआयने आधीच ईमेल करत भारतीय संघाला ट्रॉफी परत करण्यास सांगितलं होतं, अन्यथा हे प्रकरण आयसीसीकडे नेण्याचा भारताने इशारा दिला होता.