दोन दिवसांपूर्वी महेंद्रसिंह धोनीची कोट्यवधींची फसवणूक झाल्याचं वृत्त व्हायरल झालं होतं. धोनीचे पूर्वीचे व्यावसायिक भागीदार मिहिर दिवाकर यांनीच धोनीची तब्बल १५ कोटींहून अधिक रकमेची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला होता. आता मात्र मिहिर दिवाकर यांनीच महेंद्रसिंह धोनीवर फसवणुकीचे आरोप केले आहेत. मी नव्हे, तर धोनीनंच माझे काही पैसे बुडवले असून ते त्यानं मला परत करणं अपेक्षित आहे, असा आरोप मिहिर दिवाकर यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची सध्या जोरदार चर्चा होताना पाहायला मिळत आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

टीम इंडियाचा माजी कर्णधार व चेन्नई सुपर किंग्जचा विद्यमान कर्णधार महेंद्रसिंह धोनी व त्याच्या काही व्यावसायिक भागीदारांनी अर्का स्पोर्ट्स अँड मॅनजेमेंट लिमिटेडचे मिहिर दिवाकर व सौम्या विश्वास यांच्याविरोधात फसवणुकीची याचिका दाखल केली होती. २०१७ साली मिहिर दिवाकर यांनी धोनीसमवेत जागतिक दर्जाची क्रिकेट अकादमी स्थापन करण्यासंदर्भात करार केला होता. मात्र, त्या कराराचं पालन मिहिर यांच्याकडून केलं जात नसल्यामुळे धोनीचं तब्बल १५ कोटींहून अधिक रकमेचं नुकसान झाल्याचा दावा या आरोपांमध्ये करण्यात आला होता. इंडिया टुडेनं यासंदर्भातील वृत्त दिलं होतं.

अर्का स्पोर्ट्सनं फ्रँचायझी फी भरण्यांदर्भात व नफ्याची वाटणी करण्यात गैरव्यवहार केल्याचा दावा करण्यात आला होता. धोनीनं यासंदर्भात त्याच्या वतीने सर्व व्यवहार पाहण्याचे मिहिर दिवाकर यांच्याबरोबरचे करारपत्रही १५ ऑगस्ट २०२१ रोजी रद्द केल्याचा दावा याचिकेत आरोपांत करण्यात आला होता.

मिहिर दिवाकर यांचं स्पष्टीकरण

दरम्यान, धोनी व त्याच्या काही व्यावसायिक सहकाऱ्यांकडून करण्यात आलेले हे सर्व आरोप मिहिर दिवाकर यांनी फेटाळून लावले आहेत. ‘एक्स’वर (ट्विटर) यासंदर्भात मिहिर दिवाकर यांनी सविस्तर पोस्ट लिहिली आहे. “क्रीडा जगतातील माझी प्रतिमा मलीन करण्याचा हा प्रयत्न आहे”, असा दावा मिहिर दिवाकर यांनी केला आहे. “महेंद्रसिंह धोनीनंच २०१७ साली एकत्रपणे क्रिकेट अकादमीचं कामकाज पाहण्याबाबतचा करार केला होता. त्यानं हा करार कधीही मागे घेतलेला नाही”, असा दावा मिहिर दिवाकर यांनी केला आहे.

“मी धोनीला कोणतेच पैसे देणं लागत नाही. उलट धोनीनंच माझे ५ कोटी रुपये देणं बाकी आहे. धोनीनं थेट क्रिकेट अकादमीतून हे पैसे घेतले होते. मी अपार मेहनतीनं क्रीडाविश्वात माझं नाव कमावलं आहे. पण आपल्या प्रसिद्धीचा फायदा घेऊन धोनी माझ्यावर दबाव आणून माझा व्यवसाय आणि सामाजिक संबंध संपवू पाहात आहे”, असा खळबळजनक आरोप मिहिर दिवाकर यांनी केला आहे.

MS Dhoni : महेंद्रसिंग धोनीची कोट्यवधींची फसवणूक! माजी व्यावसायिक भागीदारांविरुद्ध गुन्हा दाखल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“धोनीनंच मोठा गैरव्यवहार केला”

दरम्यान, मिहिर दिवाकर यांनी उलट धोनीवरच गैरव्यवहाराचा आरोप केला आहे. “न्यूओग्लोब उपजवर्धक इंडिया लिमिटेड या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीच्या संस्थापकाविरोधात धोनी व त्याच्या काही सहकाऱ्यांनी कट रचून फसवणूक केली आहे. त्याविरोधात या कंपनीचे संस्थापक धोनीकडून स्पष्टीकरणही मागत आहेत. पण धोनी त्यांना उत्तर देत नाहीये”, असा आरोप मिहिर दिवाकर यांनी त्यांच्या पोस्टमध्ये केला आहे.