भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि सध्या चेन्नई सुपर किंग्सचं नेतृत्व करणाऱ्या महेंद्रसिंह धोनीच्या आई वडिलांना करोनाचा संसर्ग झाला आहे. धोनीचे आई-वडील करोना पॉझिटिव्ह असून त्यांना रांची येथील पल्स सुपर स्पेशॅलिटी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार धोनीचे वडील पान सिंह आणि आई देविका देवी यांच्या करोना चाचणीचा निकाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना ततडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या महेंद्रसिंह धोनी चेन्नईच्या संघासोबत आहे. झारखंडमध्येही इतर राज्यांप्रमाणे करोनाचा मोठा प्रमाणात प्रादुर्भाव होत असल्याचं चित्र दिसत आहे. करोना प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यासाठी झारखंड सरकारने लॉकडाउन लागू करण्यासंदर्भातील निर्णय घेण्याची तयारी केल्याचं चित्र दिसत आहे.

धोनीच्या आई-वडिलांना दाखल करण्यात आलेल्या पल्स सुपर स्पेशॅलिटी हॉस्पीटलच्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. दोघांच्या शरीरातील ऑक्सिजनचं प्रमाण सामान्य असून त्यांच्या फुफ्फुसांना करोनाचा संसर्ग झालेला नाही. उपचारांनंतर पुढील काही दिवसांमध्ये धोनीचे आई वडील ठणठणीत बरे होतील अशा विश्वासही डॉक्टरांनी व्यक्त केलाय.

इकडे मुंबईमध्ये धोनी आज कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामान्यात संघाचं नेतृत्व करण्यासाठी वानखडेच्या मैदानात उतरणार आहे. २०२० मध्ये युएईमध्ये पार पडलेल्या आयपीएलनंतर धोनी आपल्या कुटुंबियांसोबतच होता. या काळादरम्यान तो कोणत्याही क्रिकेट स्पर्धांमध्ये दिसून आला आहे. थेट यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नईकडून खेळण्यासाठी तो मार्चच्या सुरुवातील चेन्नईमधील संघाच्या प्रशिक्षण शिबिरामध्ये दाखल झाल्याचं पहायला मिळालं. करोना निर्बंधांमुळे प्रत्येक संघाचे सामने नियोजित मैदानामध्येच होत आहे. त्यामुळेच ९ एप्रिलपासून सुरु झालेल्या आयपीएलच्या काही दिवस आधीच चेन्नईची टीम मुंबईत दाखल झाली. त्यानंतर सात दिवस क्वारंटाइन राहिल्यानंतर संघ मैदानात उतरला.

मागील काही दिवसांमध्ये भारतामध्ये सातत्याने अडीच लाखांच्या आसपास कोरना रुग्ण आढळून येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आयपीएलमधील सर्व आठ संघांसाठी बायो बबलचे कठोर नियम करण्यात आले असून त्याचं पालन करणं हे बंधनकारक आहे. भारतात मंगळवारी एकाच दिवसात दोन लाख ९५ हजार रुग्ण आढळून आले असून पहिल्यांदाच देशातील मृतांची संख्या दोन हजारांहून अधिक झाल्याचं पहायला मिळालं आहे.