गेल्या किमान १६ वर्षांपासून महेंद्र सिंह धोनी नावाचं गारूड भारतातील तमाम क्रिकेट चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. आधी २००७ आणि नंतर २०११ साली माहीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं विश्वविजेतेपदाला गवसणी घातली आहे. सुरुवातीला तडाखेबाज खेळी करणाऱ्या धोनीनं नंतर आपली शैली काहीशी बदलली आणि तो मधल्या फळीतला जगातला सर्वोत्तम फिनिशर बनला. आयपीएलमुळे तर चेन्नई सुपर किंग्जचा थलायवा म्हणूनच माहीला क्रिकेट चाहते ओळखतात. नुकत्याच संपलेल्या लिलावामुळे आयपीएल पुन्हा चर्चेत आलेली असताना महेंद्र सिंह धोनीच्या एका विधानाची जोरदार चर्चा होताना पाहायला मिळत आहे!
४२ वर्षीय महेंद्र सिंह धोनी पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएल हंगामामध्ये पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्जचं नेतृत्व करण्यासाठी सज्ज झाला आहे. नुकत्याच पार पडलेल्या लिलाव प्रक्रियेतून चेन्नईच्या संघाशी काही नवीन नावं जोडली गेली असून काही नावं कमी झाली आहेत. मात्र, संघाच्या नेतृत्वासाठी व्यवस्थापनानं माहीवरच भरंवसा कायम ठेवला आहे. एकीकडे माहीच्या निवृत्तीच्या चर्चांनी जोर धरलेला असताना दुसरीकडे त्यानं आणखी खेळावं, चेन्नईचं नेतृत्व करावं हीच इच्छा त्याच्या चाहत्यांप्रमाणेच चेन्नई संघ व्यवस्थापनाचीही राहिली आहे!
धोनीच्या नव्या हेअरस्टाईलची चर्चा!
आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात महेंद्रसिंह धोनीच्या हेलिकॉप्टर शॉटप्रमाणेच त्याच्या हेअरस्टाईलचीही जोरदार चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं. सुरुवातीच्या काळात धोनीची मोठ्या केसांची हेअरस्टाईल चाहत्यांमध्ये लोकप्रिय झाली होती. २००७ चा विश्वचषक जिंकल्यानंतर त्यानं लांब केस कमी केले. तर २०११ चा विश्वचषक जिंकल्यानंतर माहीनं चक्क डोक्यावरचे पूर्ण केस काढून टक्कलच करून घेतलं. पण त्याचा तो लुकही चाहत्यांमध्ये तुफान लोकप्रिय झाला.
आता पुन्हा एकदा धोनीच्या नव्या लुकची चर्चा होऊ लागली आहे. धोनीनं पुन्हा एकदा केस वाढवले असून त्याचा हा लुकही चाहत्यांच्या पसंतीस पडला आहे. पण हा लुक सांभाळणं महाकठीण काम असल्याचं माहीनंच एका जाहीर मुलाखतीमध्ये सांगितलं आहे. या मुलाखतीचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून त्याची सध्या चर्चा होऊ लागली आहे.
“आधी फक्त २० मिनिटं लागायची, आता…”
आधी हेअरस्टाईल करून तयार व्हायला फक्त २० मिनिटं लागायचं असं माही म्हणाला आहे. “आधी जेव्हा मी अॅड फिल्म्ससाठी जायचो तेव्हा मी २० मिनिटांत तयार व्हायचो. मेकअप, केस वगैरे सगळं तेवढ्या वेळात व्हायचं. पण आता मला १ तास १० मिनिटं लागतात. त्या खुर्चीवर बसून मेकअप करून घेताना वाट पाहात राहाणं हे फार कंटाळवाणं आहे. पण माझ्या सर्व चाहत्यांना माझी ही हेअरस्टाईल फार आवडतेय. त्यामुळे मी आणखी काही काळ ही अशीच ठेवण्याचा प्रयत्न करेन”, असं धोनी म्हणताच उपस्थितांनी त्याला दाद दिली.
पण ही हेअरस्टाईल ठेवणं अवघड असल्याचं धोनी म्हणाला. “अशी हेअरस्टाईल सांभाळणं फार अवघड आहे. त्यामुळे मी जोपर्यंत ठेवू शकेन, तोपर्यंत ठेवण्याचा प्रयत्न करेन. पण एखाद्या दिवशी मी ठरवलं की आता पुरे झालं तर मी केस कापेन”, असं धोनी म्हणाला.