मुंबईकर आणि पुणेकरांतले द्वंद्व सर्वश्रुत आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई आणि संस्कृती जपणारी विद्यानगरी पुणे या दोन शहरांच्या गुणवैशिष्टय़ावरून रंगणाऱ्या चर्चाना आता फुटबॉलचे कोंदण लाभणार आहे. इंडियन सुपर लीगच्या निमित्ताने नवी मुंबईतील डी. वाय. पाटील मैदानावर मुंबई सिटी एफसी आणि एफसी पुणे सिटी यांच्यात शनिवारी मुकाबला रंगणार आहे.
फुटबॉल विश्वाला नवी झळाळी देऊ पाहणाऱ्या इंडियन सुपर लीग स्पर्धेत मुंबई सिटी एफसीला सलामीच्या सामन्यात अॅटलेटिको डी कोलकाताकडून पराभवाला सामोरे जावे लागले. त्यातच मुंबईचा कर्णधार सय्यद रहीम नबी दुखापतग्रस्त झाल्याने मुंबईच्या चिंतेत भर पडली आहे. या सगळ्या गोष्टी बाजूला सारून घरच्या मैदानावर दमदार पदार्पणासाठी मुंबई सिटी एफसी आतूर आहे.
दुसरीकडे पुण्याची सुरुवात बरोबरीत झाल्याने त्यांचे गुणांचे खाते उघडले आहे. दिल्ली डायनामोसविरुद्धची त्यांची लढत गोलशून्य बरोबरीत सुटली होती. मुंबईला त्यांच्याच मैदानात नमवत विजयाची बोहनी करण्यासाठी पुणेकर प्रयत्नशील आहेत.
मुंबईच्या ताफ्यातील फ्रेड्रिच लुमबर्ग आणि निकोलस अनेल्का कोलकाताविरुद्धच्या लढतीत खेळू शकले नाहीत. पुण्याविरुद्ध लुमबर्ग खेळण्याची शक्यता असल्याचे मुंबईचे प्रशिक्षक पीटर रेड यांनी सांगितले. मात्र त्यासाठी त्याला तंदुरुस्ती चाचणीचा अडथळा पार करावा लागेल.
नबी खेळू शकणार नसल्याने मॅन्युअल फ्राइडरिचकडे मुंबईच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. ‘‘येथील वातावरणाशी विशेषत: आद्र्रतेशी जुळवून घेताना अडचणी आल्या. कृत्रिम टर्फवर सराव करणे आणि नैसर्गिक टर्फवर खेळणे यात तफावत आहे. मात्र डी. वाय. पाटील मैदान उत्कृष्ट आहे. घरच्या मैदानावर सर्वोत्तम कामगिरी करू,’’ असा विश्वास मॅन्युअल फ्राइडरिचने व्यक्त केला.