Tilak Varma, Ruturaj Gaikwad News: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये येत्या २० जूनपासून ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरूवात होणार आहे. या मालिकेसाठी दोन्ही संघातील खेळाडूंनी सराव करायला देखील सुरूवात केली आहे. दरम्यान या मालिकेला सुरूवात होण्यापूर्वी हैदराबाद क्रिकेट मंडळाने मोठी घोषणा केली आहे. आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्सकडून खेळणारा तिलक वर्मा आता इंग्लंडमध्ये काऊन्टी क्रिकेट खेळण्यासाठी जाणार आहे.

हैदराबाद क्रिकेट मंडळाने आपल्या प्रेस रिलीझमध्ये म्हटले की, ” हैदराबाद क्रिकेट मंडळाला हे सांगताना अतिशय आनंद होत आहे की, हॅम्पशायर संघाने काऊंटी क्रिकेटमध्ये तिलक वर्माला आपल्या संघात खेळवण्यासाठी संपर्क साधला आहे.” तिलक वर्माने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली आहे. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमधील १८ सामन्यांमध्ये ५०.१६ च्या सरासरीने १२०४ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ५ शतकं आणि ४ अर्धशतकं झळकावली आहेत.

तर दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाड देखील काऊंटी चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी यॉर्कशायर संघासोबत करार केला आहे. तो यॉर्कशायर संघाकडून डिव्हिजन १ चे आणि वनडे कप स्पर्धेतील सामने खेळताना दिसून येणार आहे. यॉर्कशायर संघाकडून आपल्या अधिकृत वेबसाईटवर याबाबत माहिती देण्यात आली आहे. सध्या तो भारतीय अ संघाचा भाग आहे. येत्या १३ जूनपासून भारतीय अ संघ मुख्य संघाविरूद्ध सराव सामना खेळताना दिसून येणार आहे.

यॉर्कशायरने आपल्या अधिकृत वेबसाईटवर लिहिले की, “आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज संघाचं आणि रणजी ट्रॉफीत महाराष्ट्र संघाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या ऋतुराज गायकवाडकडे ६ वनडे आणि २३ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा अनुभव आहे. हा फलंदाज टॉप ४ मध्ये फलंदाजी करू शकतो.”

तर दुसरीकडे तिलक वर्माच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर आयपीएल २०२५ त्याला हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. या स्पर्धेतील १६ सामन्यांमध्ये त्याला २ अर्धशतकांसह ३४३ धावा करता आल्या. तर भारतीय संघासाठी त्याला ४ वनडे, २५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा अनुभव आहे. वनडे क्रिकेटमध्ये त्याने ६८ धावा केल्या आहेत. तर टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावे ७४९ धावा करण्याची नोंद आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.