यंदाच्या युवा (१९ वर्षांखालील) विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना सध्या चालू आहे. दक्षिण आफ्रिकेच्या सहारा पार्क स्टेडियमवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा सामना खेळवला जात आहे. या सामन्यात मुंबईकर मुशीर खान हा भारतीय संघाचं प्रतिनिधीत्व करत आहेत. मुशीर हा रणजी क्रिकेट गाजवणारा आणि नुकतीच भारताच्या वरिष्ठ संघात निवड झालेल्या सरफराज खानचा धाकटा भाऊ आहे. मुशीरने युवा विश्वचषक स्पर्धेत आणि रणजी क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. मुशीर या स्पर्धेत ९७ क्रमांकाची जर्सी परिधान करून खेळतोय. जर्सीसाठी ९७ हा क्रमांक का निवडला याबाबत मुशीरने एक खास कारण सांगितलं.

मुशीर म्हणाला, “मी ९७ क्रमांकाची जर्सी निवडली आहे. कारण माझ्या वडिलांचं नाव नौशाद आहे. हिंदी भाषेत ९७ म्हणजेच नौ-सात (नऊ आणि सात हे अंक) अशा अर्थाने मी जर्सीसाठी हा क्रमांक निवडला.” मुशीरने यंदाच्या युवा विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत खेळवलेल्या सहा सामन्यांमध्ये २ शतकांसह ६७.६० च्या सरासरीने ३३८ धावा फटकावल्या आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात त्याने १३१ धावांची खेळी साकारली होती. तर आयर्लंडविरुद्ध त्याने ११८ धावांची खेळी साकारली होती. त्याचबरोबर गोलंदाजीत त्याने २३.३३ च्या सरासरीने ६ बळीदेखील घेतले आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात त्याने १० धावांत दोन बळी घेतले होते.

हे ही वाचा >> U19 World Cup Final : कोण आहे हरजस सिंग? ऑस्ट्रेलियाचा डाव सांभाळण्यात बजावली मोठी भूमिका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, एकोणीस वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर निर्धारित ५० षटकांमध्ये ७ बाद २५३ धावांचा डोंगर उभा केला आहे. या स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या संघाने फायनलमध्ये २५० धावांचा टप्पा ओलांडला आहे. दक्षिण आफ्रिकेतील सहारा पार्क मैदानातील खेळपट्टी गोलंदाजीसाठी अनुकूल असल्यामुळे या मैदानावर २५३ ही खूप मोठी धावसंख्या मानली जात आहे. त्यामुळे भारतासमोरच्या अडचणी वाढल्या आहेत. विश्वचषक उंचावण्यासाठी कर्णधार उदय सहारनच्या संघाला निर्धारित ५० षटकांमध्ये २५४ धावांची आवश्यकता आहे.