सौराष्ट्र : गोलंदाजांच्या भरीव कामगिरीनंतर सलामीवीर पृथ्वी शॉने केलेल्या अर्धशतकाच्या बळावर मुंबईने सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० चषक क्रिकेट स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात मिझोरमवर नऊ गडी आणि ५७ चेंडू राखून विजय मिळवला. या सामन्यात मिझोरमला २० षटकांत केवळ ८ बाद ९८ धावांवर रोखल्यानंतर मुंबईने हे लक्ष्य १०.३ षटकांत गाठले. मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणे (९ धावा) लवकर माघारी परतला. यानंतर पृथ्वीने (३४ चेंडूंत नाबाद ५५ धावा) अमन खानच्या (२२ चेंडूंत नाबाद ३९) साथीने दुसऱ्या गडय़ासाठी ९१ धावांची अभेद्य भागीदारी रचत मुंबईला विजय मिळवून दिला. पृथ्वीने आपल्या खेळीत नऊ चौकार आणि एक षटकार लगावला. त्यापूर्वी, मिझोरमच्या फलंदाजांचा मुंबईच्या शम्स मुलानी (२/२०), तनुष कोटियन (२/१२) आणि धवल कुलकर्णी (२/१६) या गोलंदाजांसमोर निभाव लागला नाही. त्यामुळे मिझोरमला निर्धारित २० षटकांत ८ बाद ९८ धावाच करता आल्या.

संक्षिप्त धावफलक

मिझोरम : २० षटकांत ८ बाद ९८ (श्रीवत्स गोस्वामी ३१, विकाश कुमार २४; शम्स मुलानी २/२०, तनुष कोटियन २/१२, धवल कुलकर्णी २/१६) पराभूत वि. मुंबई : १०.३ षटकांत १ बाद १०३ (पृथ्वी शॉ ५५, अमन खान ३९; रेमरुआतदिका राल्टे १/१४)

‘प्रभावी खेळाडू’चा दिल्लीकडून वापर

‘बीसीसीआय’ने नव्याने आणलेल्या प्रभावी खेळाडू (इम्पॅक्ट प्लेयर) या बदली खेळाडू नियमाचा दिल्लीच्या संघाने सर्वप्रथम वापर केला. दिल्लीने हितेन दलालच्या (४७) फलंदाजीमुळे ७ बाद १६७ धावा केल्या. त्यानंतर त्याला बदलून दिल्लीने हृतिक शोकिन या फिरकी गोलंदाजाला अंतिम ११ खेळाडूंमध्ये घेतले. त्याने दोन गडी बाद करताना मणिपूरला ९६ धावांत गुंडाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. दिल्लीने ७१ धावांनी हा सामना जिंकला.